करमाळा पोलिसांच्या वतीने पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या संकल्पनेतून आज (बुधवार) रेकॉर्डब्रेक रक्तदान शिबीर झाले. करमाळा पोलिस मैदान येथे भव्य मंडप उभारून रक्तदान शिबीर घेण्यात आले. याशिवाय तालुक्यातील केम, कंदर, जेऊर, जिंती, जातेगाव, साडे, सालसे, वाशिंबे चौफुला, कोर्टी व हिसरे या भागातही रक्तदात्यांसाठी व्यवस्था करण्यात आली होती.
26/ 11 (2008) ला मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वीरमरण प्राप्त झालेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये 2 हजार 126 जणांनी सहभाग घेऊन विक्रमी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना करमाळा पोलिस ठाणे यांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकारी श्रीमती आव्हाड, पोलिस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम आदींच्या उपस्थितीत या शिबिराचा प्रारंभ झाला. करमाळा तालुक्यातील हे सर्वात मोठे रक्तदान शिबीर मानले जात आहे. ‘देश भावना व समाजभावना’ निर्माण व्हावी म्हणून हे शिबीर घेतल्याचे माने यांनी सांगितले.
पोलिस निरीक्षक माने म्हणाले, ‘भारतीय सैन्य दल, पोलिस दल व सामान्य नागरिकाचा अपघात झाला तरी रक्ताची कमतरता जाणवते. त्यांना आपला हातभार असावा ही भवानी होती. हे रक्तदान शिबिर कोणत्याही एकट्याचे नव्हते. तर संपूर्ण करमाळा तालुका यामध्ये सहभागी झाला. यामध्ये रक्तदात्याचे ब्लड ग्रुप चेक करण्यात आले. त्यांना तहयात अपघात झाल्यास त्याला लागणारी रक्ताची बाटली जिची किंमत 1600 रुपये आहे ती बाटली त्याला अल्प दरामध्ये उपलब्ध होणार आहे, असेही पोलिस निरीक्षक माने म्हणाले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी व पोलिस पाटील यांचे मोठे सहकार्य मिळाले.
