करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी डिझेल व पेट्रोलबाबत ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. कॅन व बाटलीत यापुढे डिझेल व पेट्रोल मिळणार आहे. त्यांच्या एका आदेशामुळे शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय सुरु झाली होती. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होताच आठ दिवसांपूर्वी दिलेला आदेश त्यांनी रद्द केला आहे.
उन्हाळा सुरु होताच शेतकऱ्यांची शेतातील कामे सुरु होतात. मात्र जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी डिझेल व पेट्रोल कॅन व बाटलीत देऊ नये असा आदेश दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची व सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय सुरु झाली होती. शेतकऱ्यांना ट्रॅकर, पावर टेलर, जनरेटर अशी शेतात वापरली जाणारी अवजारे डिझेल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर आणणे तोट्याचे होते. त्यात त्यांचा वेळ व पैसा जातो. त्यामुळे त्यांना कॅनमध्ये डिझेल व पेट्रोल घ्यावे लागते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे त्यांची गैरसोय सुरु झाली होती. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनीही याबाबत आवाज उठवला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यापूर्वीचा आदेश रद्द केला आहे. त्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
