करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका हमाल पंचायतच्या वतीने माथाडी कायद्यातील सुधारणा करणाऱ्या विधेयकाविरुद्ध तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. माथाडी कायद्यातील सुधारणा विधेयक तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. करमाळा तालुका हमाल पंचायतचे तालुकाध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी हे निवेदन स्वीकारले.
महाराष्ट्र सरकारने 1969 मध्ये पारीत केलेला माथाडी कायदा याची स्तुती आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने केंद्र सरकारने देशभरातील काही राज्यांनी केली. त्या कायद्याची महाराष्ट्रात केवळ 20 ते 25 टक्के अंमलबजावणी होते. अशा स्थितीत सदर कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी कायद्यात व धोरणात बदल अपेक्षीत असताना आपण सदर कायद्यात सुधारणेच्या नावाखाली नकारात्मक बदल केलेले दिसत आहे, असे म्हणत करमाळा तालुका हमाल पंचायतच्या वतीने विरोध करण्यात आला.
विधानसभेत व विधान परिषदेत हे विधेयक मंजूर होऊ नये म्हणून त्या विधेयकाच्या प्रतीची होळी करून आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालय येथे सर्व हमाल, तोलार, शेतमजूर, असंघटित कामगार उपस्थित होते.