करमाळा (अशोक मुरूमकर) : भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेवारी दिल्यानंतर नाराजी व्यक्त करत धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी केली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखलही केला. दरम्यान भाजपमधील काही मोहिते पाटील समर्थकांनी पदाचा राजीनामाही दिला. आता शिवसेनेतेही (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) राजीनामानाट्य सुरु झाल्याचे दिसत आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी राजीनामा दिला आहे. हा राजीनामा सध्या सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. बागल म्हणाले, शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि आम्हाला डावलले जात असल्याने आपण हा राजीनामा देत आहे. माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी या निवडणुकीत प्रयत्न करत आहोत. तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन, टेंभुर्णी ते जातेगाव महामार्ग, विजेचा प्रश्न व पाणी प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. मराठा आरक्षण हा देखील महत्वाचा विषय असून हे प्रश्न मार्गी लागणे आवश्यक होते. हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला अपयश आले आहे, असे त्यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलला सांगितले आहे.
तालुकाप्रमुख बागल हे माजी आमदार पाटील समर्थक आहेत. पाटील हे काही दिवसातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी ते परिश्रम घेत आहेत. यापूर्वी करमाळ्यातून अमरजित साळुंखे यांनी भाजपच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता बागल यांनी शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिला आहे.