करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘महसूल सेवा पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महसुलचे नायब तहसीलदार विजयकुमार जाधव व निवासी नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे उपस्थित होते.
तहसीलदार ठोकडे म्हणाल्या, ‘महसूल सेवा पंधरवढा’मध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे असलेले रस्ते खुले करून त्यांना क्रमांक दिले जाणार आहेत’. याशिवाय सर्वांसाठी घरे या उपक्रमात कायदेशीररित्या भूमिहीन असलेल्यांना जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पाणंद रस्त्यामध्ये गावात शिवारफेरी करून माहिती घेतली जाणार आहे. १७ तारखेला गावात विशेष ग्रामसभा घेतली जाणार आहे. नाविन्यपूर्ण योजनाची माहिती दिली जाणार आहे. तालुक्यातील सैनिकांचे प्रश्न सोडवले जाणार आहेत. याबरोबर तालुक्यातील एका गावात सर्व योजना कशा राबविता येतील हे पाहिले जाणार आहे. तसे गाव निवडून २ तारखेला त्याची घोषणा केली जाणार नाही. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये माहिती देण्यासाठी १७ तारखेला विशेष ग्रामसभा घेऊन प्रश्न मार्गी लावण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी आम्ही उपस्थित राहणार आहोत. नागरिकांना सर्व योजना वेळेत मिळाव्यात असा प्रयत्न केला जाणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा’, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.