करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याविरोधात आमदार नारायण पाटील यांनी नागरपूर येथील हिवाळी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची मागणी समितीकडे केली. याशिवाय विधानसभेच्या सभापतींकडे लेखी तक्रारही केली आहे. मात्र याबाबत आता तहसीलदार ठोकडे यांना पाठींबा देण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते समोर येऊ लागले आहेत. सोशल मीडियावर सध्या ‘I Support ठोकडे मॅडम’चे मेसेज फिरत आहेत. दरम्यान याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ‘हक्कभंग’ दाखल झाल्याची तहसीलदार ठोकडे यांना अधिकृतरीत्या नोटीस किंवा आलेली नाही.
आमदार पाटील यांच्याकडून विधानसभा सभापती यांच्याकडे तहसीलदार ठोकडे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव
हक्कभंग प्रस्ताव म्हणजे काय?
हक्कभंग प्रस्ताव म्हणजे विधिमंडळाच्या सदस्यांचे विशेषाधिकार किंवा हक्क यांचा कोणी भंग केल्यास ते सदस्यांच्या वतीने सभागृहात आणले जाणारे एक निवेदन किंवा तक्रार आहे. सभागृहाचा अपमान किंवा अडथळा आणल्याबद्दल संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी त्यामध्ये केली जाते. यामध्ये विधानमंडळाच्या कामकाजास बाधा आणणे, मानहानि करणे किंवा सदस्यांना धमकावणे अशा कृतींचा समावेश असतो.
प्रक्रिया कशी असते?
संबंधितांविरुद्ध हक्कभंग दाखल झाल्यानंतर अध्यक्षांना त्यात तथ्य वाटले तर ती तक्रार समितीकडे पाठवली जाते. त्यानंतर त्या व्यक्तीला समिती बोलावून घेते. चर्चा करून पुरावे, साक्ष घेऊन अहवाल तयार करते. हा अहवाल सभागृहाला दिला जातो. त्यानंतर सभागृह संबंधिताला काय शिक्षा द्यायची हे ठरवते.
काय असते शिक्षा?
हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला शिक्षा देण्याचा अधिकार सभागृहाला असतो. हक्कभंग दाखल झालेली व्यक्ती सभागृहाबाहेरील असेल तर त्यांना समन्स बजावले जाते. त्यांना ताकीद देणे, समज देणे, दंड आकारणे किंवा सभागृहाला योग्य वाटल्यास कारवाई करणे.
ठोकडे यांच्यावर काय आहे आरोप?
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणवा व चौकशी करावी; अशी मागणी केली. विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडेही त्यांनी लेखी तक्रार केली आहे. ‘शेतीच्या वादाचे निवारण करुन निकाल देण्यास होत असलेली दिरंगाई, प्रलंबीत असलेली अनेक प्रकरणे. काही वर्षांपासून महसुल विभागातील कर्मचारी खुलेआम गैरव्यहावर करत आहेत. अतिवृष्टीमधील नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून कमीशन घेतल्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
सोशल मीडियात काय?
कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे व शिल्पा ठोकडे यांच्या कार्याचा सन्मान करायला पाहिजे. मात्र त्यांच्या विरोधात हक्कभंग व इतर कृत्य केले जात आहे. तहसीलदार ठोकडे या आमच्या करमाळ्याचा अभिमान आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आम्हाला मान्य नाही. करमाळाकर म्हणून मी स्वतः ठोकडे मॅडम यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. I Support ठोकडे मॅडम. असे अनेक मेसेज फिरत आहेत. सीना नदी पूर व अतिवृष्टीत त्यांनी केलेल्या कामाचे फोटो व्हायरल केले जात आहेत.
