करमाळा (अशोक मुरूमकर) : फोनवर बोलत सोन्याच्या दुकानात चोरी केली असल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यामध्ये अनोळखी संशयित महिलेविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात दुकानचे मालक अभिजित अशोक दोशी (वय ४५, करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (ता. ६) हा प्रकार घडला. दुकानातील कामगारांना नेहमी प्रमाणे त्यांनी सकाळी विक्रीसाठी दागिने दिले. सायंकाळी दुकान बंद करतेवेळी हिशोब करत असताना दिलेले दागिने आणि विक्री झालेले दागिने यामध्ये तापवत दिसली. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला. तेव्हा दुकानात ग्राहक बनून आलेली एक महिला फोनवर बोलताना दिसली. तिला दुकानातील कामगार महिला दागिने दाखवत होती. तिने फोनवर बोलत- बोलत अर्धा तोळ्याचा एक झुमका हातचलाखीने बॅगेत टाकला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास सुरु आहे.
फोनवर बोलत सोन्याच्या दुकानात चोरी! करमाळ्यात सीसीटीव्हीत घटना कैद
