करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराने वातावरण तापले आहे. त्यात आता राजीनामास्त्र सुरु झाले आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांना पाठींबा दिला आहे. आता कंदर येथील जगताप गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते अण्णासाहेब पवार यांच्या पत्नी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका साधना पवार यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा नेमका का दिला? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
पवार हे जगताप गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पत्नी साधना पवार या बाजार समितीच्या बिनविरोध संचालिका आहेत. काल (शुक्रवार) कंदर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रचारार्थ सभा झाली होती. माजी आमदार जगताप या सभेवेळी उपस्थित होते. त्यानंतर पवार यांनी हा राजीनामा दिला आहे.
पवार म्हणाले, ‘मी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. माझे साहेब हे जगताप आहेत. मी २० तारखेपर्यंत माझ्या मर्जीने काम करणार आहे. २१ तारीख झाल्यानंतर मी साहेबांचाच राहणार आहे. त्यांनी लाथाडले तर राजकीय सन्यास घेईल. कंदर येथील सभेत साहेबांनी मला स्वाभिमानाने राजीनामा देण्यास सांगितले. मी त्यांचा आदेश पाळला आहे. मी हाडाचा कार्यकर्ता आहे. त्यांचा आदेश पाळणे हे माझे कर्तव्य आहे. पुढील आदेश आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेऊ. या निवडणुकीत आम्ही योग्य उमेदवाराच्याबरोबर जाणार आहे’, असे पवार म्हणाले आहेत.