करमाळा (सोलापूर) : शालेय जीवनातच विद्यार्थिनींना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान, आर्थिक साक्षरता, स्वावलंबन व व्यवस्थापन कौशल्यांचा अनुभव यावा म्हणून नगरपालिकेच्या साधनाबाई नामदेवराव जगताप मुलींच्या शाळेमध्ये ‘बाल आनंदी बाजार’ भरवण्यात आला होता.
नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड, नगरसेवक संजय सावंत, नगरसेवक विक्रमसिंह परदेशी, नगरसेविका स्वाती फंड, नगरसेविका अश्विनी अब्दुले, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे- पाटील, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व अनेक पालकांनी त्यांच्याकडून आठवडी बाजाराची खरेदी केली. यावेळी विद्यार्थ्यांनींनी भाजीपाला, खाऊ, हस्तकला वस्तू, सजावटीचे साहित्य आदींचे स्टॉल्स उभारले होते. खरेदी-विक्री व्यवहार करताना ग्राहकांशी संवाद साधणे, किंमत ठरवणे, पैसे हाताळणे तसेच नफा-तोट्याचा अंदाज घेणे याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला.
मुख्याध्यापक दयानंद चौधरी म्हणाले, ‘स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक गुण महत्त्वाचे नसून प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडणारी कौशल्ये आत्मसात करणेही आवश्यक आहे. त्यासाठी ‘बाल आनंद बाजार’ उपक्रम राबवला.’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या शिंदे यांनी केले तर आभार रमेश नामदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सुनीता क्षीरसागर, सुवर्णा वेळापूरे, मोनिका चौधरी, तृप्ती घोलप- बेडकुते, भाग्यश्री पिसे, योगिनी चवरे यांनी परिश्रम घेतले.
