करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील ४० गावांच्या दृष्टीने महत्वाची समजली जाणारी कुकडी उजनी उपसासिंचन योजनेबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. १५) दुपारी ३ वाजता करमाळ्यात बैठक होणार आहे, अशी माहिती समजत आहे. यावेळी संघर्ष समितीची वाटचाल व त्या संदर्भातील भूमिका घेण्याबाबत सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी अध्यक्ष यांच्यासह शेतकरी बांधव यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाणार आहे.
पावसाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुकडी उजनी उपसासिंचन योजनेच्या सर्व्हेक्षणाबाबत आदेश दिले आहेत. यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी केलेला पाठपुरावा महत्वाचा आहे. रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बहिष्काराचा इशारा दिला होता. माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता.
आमदार शिंदे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कुकडी उजनी उपसासिंचन योजना तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची असून त्याचे सर्व्हेक्षण करण्यासाठी आपण पाठपुरावा केला आहे. सर्वेक्षणाबाबत निधीही लवकरच उपलब्ध होईल. रिटेवाडी उपसासिंचन संघर्ष समितीने याबाबत वस्तुस्थितीदर्शक वास्तव चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती नागरिकांना दिली जात आहे. सरपंच अंकुश शिंदे यांच्या पुढाकारातून गावागावांमध्ये जनजागृतीही करण्यात आली होती.
‘या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चार दिवसात वेळ मिळणार असून तसेच पुढील कालावधीमध्ये संघर्ष समितीची वाटचाल व त्या संदर्भातील भूमिका घेण्याबाबत’ ही बैठक असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले जात आहे. सोमवारी दुपारी ३ वाजता बलदोटा काका निवासस्थान बारा बंगले दत्त मंदिराच्या मागे करमाळा येथे ही बैठक होणार आहे. यावेळी सर्व पदाधिकारी, शेतकरी बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रिटेवाडी उपसासिंचन संघर्ष समितीने केले आहे. (बातमीत वापरलेले छायाचित्र हे संग्रहीत आहे.)