करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उत्साह वाढला असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) व काँग्रेसमध्ये जागा वाटप कसे असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात पवार गट नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याने करमाळा तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते आज (मंगळवारी) दिल्लीत शरद पवार यांची भेट घेत आहेत. खासदार शपथविधीच्या निमित्ताने ते लंके यांच्याबरोबर ते दिल्लीत गेले आहेत.
करमाळा तालुक्याचे राजकारण नेहमी स्थानिक गटांवर चालते. मात्र निवडणुकीत उतरताना पक्षाचे चिन्ह मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे चित्र दिसते. किंवा अपक्ष उतरायचे असले तरी पुरस्कृत होण्याकडे कल असतो. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाची कामगिरी चांगली होती. मीडिया रिपोर्टनुसार शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर वारे यांनीही सर्वांशी चर्चा करून निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.
वारे यांनी तालुकाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी वाढवण्यासाठी भर दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे, खासदार निलेश लंके, आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटी वाढवल्या आहेत. त्यांनी केलेल्या सामाजिक कामाचा आराखडा ते मांडत आहेत. कोरोना काळात केलेले काम व दुष्काळात टँकरद्वारे काही गावात त्यांनी मोफत पाणी पुरवठा केला होता. पोलिस ठाणे, तहसील कार्यालय येथे नागरिकांना अडचणी आल्या तर त्या सोडवण्यावर त्यांचा भर राहतो आहे. त्यांच्या पत्नी राणी वारे या पांडे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या होत्या. त्यामाध्यमातूनही त्यांनी चांगले काम करून गटात जनसंपर्क वाढवलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी आपण दावा करणार असल्याचे वारे सांगत आहेत. बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्याशीही याबाबत विचारविनियम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.