करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणात वादळी वाऱ्याने कुगाव ते कळशी दरम्यान प्रवासी बोट उलटून निष्पाप सहाजणांचे बळी गेले. त्यात झरे येथील पती- पत्नी व मुलांचाही सामावेश आहे. उजनी धरणात झालेली ही दुर्दैवी पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा घटना झाल्या आहेत. या घटना कधी थांबणार हा प्रश्न असून यानिमित्ताने १९९६ मध्ये झालेल्या घटनेची थरारक आठवण वीट येथील ५६ वर्षाच्या रणरागिणीने ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितली आहे. अंजना दत्तात्रय जाधव असे त्यांचे नाव आहे.
अंजना जाधव यांचे माहेर उंदरगाव आहे तर सासर वीट आहे. उंदरगाव येथील कै. बाबुराव निकत यांच्या त्या कन्या! उजनी धरणातील पाण्यामुळे त्यांच्या एका शेतातून दुसऱ्या शेतात जाण्यासाठी होडीचा वापर करावा लगत. अंजना यांचा विवाह झाल्यामुळे त्या सासरी म्हणजे विटला गेल्या. तेथून १९९६ मध्ये दिवाळीनिमित्त त्या माहेरी म्हणजे उंदरगावला आल्या होत्या. माहेरी असताना त्या वडिलांच्या एका शेतातून दुसऱ्या शेतात होडीने जात होत्या. तेव्हा त्यांच्या होडीत चालकासह १० जण होते. मात्र मध्यात गेल्यानंतर त्यांच्या होडीत पाणी घुसले आणि होडी बुडायला लागली. प्रत्येकजण स्वतःचा जीव वाचण्याचा प्रयत्न करत होता. अशातच या रणरागिणीने अंगावरची साडी काढली व प्रकरचा काष्टा घालून साडीला पकडून एकएकाला बाहेर काढले. मात्र अशातही दोघांना जीव गमवावा लागला होता.
अंजना जाधव म्हणाल्या, ‘दिवाळीनिमित्त उंदरगावला गेले होते. एका शेतातून दुसऱ्या शेतात जायचे तर होडीचा वापर करावा लागत होता. त्यामुळे आम्ही होडीने निघालो. होडीचालक साधणार ८० वर्षाचा असेल. त्यात भावजई व तिची मुलं, आई, चुलत भावजई, शेजारील एक बाई, मी स्वतः व होडीचालक असे १० जण होतो. साधारण १२०० मीटरचा आम्हाला होडीने प्रवास करावा लागणार होता. मात्र निम्म्याच्यापुढे गेल्यानंतर होडीच्या फळीतून पाणी घुसले. काही क्षणात होडी बुडणार होती. त्यामुळे सर्वांचा कालवा सुरु झाला. होडीचालकाने होडीचा घोडा पकडला आणि बोट पाण्यात बुडू नये म्हणून प्रयत्न केला.
एका रुग्णवाहिकेत आई व चिमुकली तर दुसऱ्या रुग्णवाहिकेत वडील व चिमुकल्याचा मृतदेह! फक्त कळशीपर्यंतचाच नव्हे तर संपूर्ण आयुष्याचाच संपला प्रवास
पुढे बोलताना जाधव म्हणाल्या, मला चांगले पोहता येत होते. बोट बुडत आहे त्यातील सर्वांचा जीव जाणार आहे, असे लक्षात येताच मी अंगावरील साडी काढली आणि प्रकरचा काष्टा घातला. कशाची विचार न करता त्या साडीला पकडून एक- एकजण पोहोत बाहेर काढायला सुरु केले. परिसरात कालवा केला, आम्हाला वाचवा आम्हला वाचवा म्हणून आवाज दिली. आपल्याला वाचवायला कोण येत आहे का? याचा विचार न करता एक- एक जीव बाहेर काढत राहिले. त्यात सातजणांचा जीव वाचवण्यात यश आले. मात्र भावजई व त्यांच्या मुलाचा त्यात जीव गमावला. ते जीव गेले याचे दुःख अजूनही मनात आहे, असे त्या सांगत आहेत. या कामगिरीबद्दल जाधव यांचा वीटमध्ये सत्कारही झाला होता. अंजना जाधव यांना दोन मुले, एक मुलगी आहे. पती दत्तात्रय व एक मुलगा शेती करतो. दुसरा मुलगा पोलिस आहे.
उजनी धरणातील बोट अपघात घटना : शवविच्छेदनासाठी मृतदेह करमाळ्यात आणले जाणार
करमाळा तालुका दुःखात! शोकाकुल वातावरणात झरेत माय-लेक व बाप- लेकावर तर कुगावामध्ये दोघांवर अंत्यसंस्कार