करमाळा (अशोक मुरूमकर) : पोथरेच माझ्या जीवनाला दिशा देणारे गाव आहे म्हणत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी गावातील बालपणाच्या आठवणी सांगिल्या. येथील शनी मंदिर देवस्थानच्या विकासासाठी निधी मिळवून दिला जाईल, असे अश्वासनही त्यांनी दिले. या गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले असून त्यांचे बालपण गेले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आज (शनिवार) सत्कार झाला. त्यांनी येथील अनेक आठवणी सांगत या सत्काराला उत्तर दिले. यावेळी त्यांच्या हस्ते काही व्यक्तींचा सन्मानही झाला.
प्रा. शिंदे यांची गावात बैलगाडीत बसून वाजत गाजत व फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली. ते म्हणाले, ‘पोथरेत माझं बालपण गेले. या गावातील अनेक आठवणी आहेत. या गावात माझे बालपण गेले नसते तर मी या पदापर्यंत गेलो नसतो. मी अतिशय खोडसर होतो कडू कुटुंबीयांचा भाचा असलो तरी येथील शिंदे कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी माझ्यावर केलेले प्रेम मी कधीच विसरू शकत नाही’ असे ते म्हणाले.

पुढे बोलताना प्रा. शिंदे म्हणाले, ‘पहिल्यांदा मी पर्यटन मंत्री असूनसुद्धा येथील शनी मंदिराच्या विकास निधीसाठी माझ्याकडे कोण आले नाही. मंत्रीपद गेल्यानंतर आले. कोट्यवधींचा निधी देण्याचे मला अधिकार होते. आता या मंदिराकडे गेल्यानंतर मला याची आठवण झाली. आताही वेळ गेली नाही पुन्हा ती संधी आली आहे. तेव्हा फक्त एका विभागाचा मंत्री होतो आता सर्व विभागाचे मंत्री माझ्याकडे येतात. त्यामुळे निधीसाठी अडचण नाही. शनिमंदिर हे साडेतीन पिठापैकी एक शक्ती पीठ आहे. या देवस्थानचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी मी निश्चित लक्ष घालील,’ असे आश्वासन सभापती प्रा. शिंदे यांनी दिले आहे. रिटेवाडी उपसासिंचन योजना व गावातील कॅनलपट्टीच्या रस्त्यामध्येही लक्ष घालतो, असे आश्वासन त्यांनी दिले.

आमदार नारायण पाटील, करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, ऍड. राहुल सावंत, सरपंच अंकुश शिंदे, पोलिस पाटील संदीप शिंदे पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, विठ्ठल शिंदे, हरिभाऊ झिंजाडे, प्रा. आजिनाथ झिंजाडे, शशिकांत पवार, नितीन झिंजाडे, हरिभाऊ हिरडे, माजी सरपंच डॉ. अभिजित मुरूमकर, भाजपचे रामभाऊ ढाणे, रासपचे अंगद देवकाते, काका सरडे, बाळासाहेब कुंभार, हरिभाऊ झिंजाडे, भाऊसाहेब खरात, प्रमोद झिंजाडे, अक्षय ठोंबरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच अंकुश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक नेते हरिश कडू यांनी केले.
