आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख महेश चिवटे व पांगरे येथील संजय गुटाळ यांची प्रशासकीय मंडळात अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीचे पत्र आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या हस्ते देण्यात आले. हे पत्र देताना आदिनाथ बचाव समितीचे हरिदास डांगे हे दिसताच मंत्री सावंत हे संतापले. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याची सत्यता ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने केलेली नाही.
आदिनाथचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून बाळासाहेब बेंद्रे यांची नियुक्ती काही दिवसांपूर्वी झाली आहे. त्यानंतर प्रशासक मंडळ येणार अशी चर्चा होती. अखेर ती चर्चा खरी ठरली असून चिवटे आणि गुटाळ यांची यामध्ये अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. या निवडीचे पत्र आज (रविवारी) सोनारी येथे देण्यात आले.
हे पत्र स्वीकाताना करमाळ्यातून चिवटे यांच्याबरोबर अनेक मंडळी गेली होती. त्यात आदिनाथ बचाव समितीचे डांगे हेदेखील होते. मंत्री सावंत यांना डांगे दिसताच संतापले. ‘या कार्यक्रमाला कमलाईचे डायरेक्टर कशाला? आदिनाथची वाट लावता काय? असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. त्यावर चिवटे यांनी स्पष्टीकरण देत ते आता कमलाईत नाहीत, राजीनामा दिला आहे असे सांगितले. ‘मागच्यावेळी इकडली लोकं त्यांनी उचलली. मग कमलाईची का उचलली नाहीत. पुन्हा बोलू नका माझ्याबरोबर असलं नाही करायचे, आम्हीही त्याच मातीतील आहोत, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.’ कोणत्या विषयावरून डांगे यांना मंत्री सावंत बोलले हे लक्षात येत नसले तरी कारखान्याचा तो विषय असावा, अशी चर्चा आहे. याबाबतचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.