सोलापूर : सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील सहाजणांची वर्णी लागली आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातून आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक ऍड. राहुल सावंत यांना संधी मिळाली आहे. ऍड. सावंत हे करमाळा पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत. त्यांच्यासह सांगोला तालुक्यातून माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनाही संधी मिळाली आहे.
अजित पवार हे सरकारबरोबर गेल्यापासून जिल्हा नियोजन समितीत त्यांच्या गटातील कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात आता या सदस्यांची यादी राज्य सरकारच्या नियोजन विभागाचे एन. बी. खेडकर यांनी ही यादी दिली आहे. माजी आमदार साळुंखे पाटील, ऍड सावंत यांच्यासह मोहोळ तालुक्यातून सज्जन पाटील, माढा तालुक्यातील नीता ढाणे, सुरेश पालवे पाटील व बार्शीतून निरंजन भूमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जाऊन सत्तेत सहभाग घेतला. तेव्हापासून जिल्हा नियोजन समितीत त्यांच्या गटातील कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले होते. करमाळा तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे माजी आमदार नारायण पाटील व भाजपचे गणेश चिवटे हे जिल्हा नियोजन समितीवर आहेत. आता आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक ऍड. सावंत यांची वर्णी लागली आहे.
ऍड. सावंत यांना गेल्या पंचवार्षिकमध्ये करमाळा पंचायत समितीवर पाटील गटाकडून सभापतिपदाची ऑफर होती. मात्र त्यांनी ती नाकारली आणि शिंदे गटातच थांबले अशी चर्चा आहे. त्यानंतर बाजार समिती निवडणुकीवेळी सावंत गटाचे सुनील सावंत हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. मात्र शेवटच्याक्षणी त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे बाजार समिती माजी आमदार जगताप गटाच्या ताब्यात बिनविरोध जाण्यास मदत झाली होती. सावंत गटाची करमाळा तालुक्याच्या राजकारणात अनेकदा महत्वाची भूमिका राहिली आहे. ऍड. सावंत यांच्या जिल्हा नियोजन समितीमुळे जिल्हा पातळवीर काम करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. आमदार शिंदे यांच्यामुळे त्यांना ही संधी मिळाली असून येणाऱ्या काळात या संधीचा ते कसा फायदा करतील, हे पहावे लागणार आहे.