करमाळा (अशोक मुरूमकर) : शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांचे बंधू महेश चिवटे यांना आज (शनिवार) सकाळी ८ वाजताच्या सुमारास हिवरवाडी परिसरात मारहाण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी तत्काळ घटनासस्थळी भेट दिली. दरम्यान हा हल्ला बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांच्या सांगण्यावरून झाला असल्याचा आरोप चिवटे यांनी केला आहे. तर हा आरोप बागल यांनी पत्रकार परिषेद घेऊन फेटाळला आहे.
चिवटे हे सकाळी नेहमीप्रमाणे हिवरवाडी येथील त्यांच्या शेतात गेले होते. तेव्हा मोटारसायकलवर येऊन एकाने हल्ला केला असल्याचे चिवटे यांनी म्हटले आहे. चिवटे यांना तपासणीसाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संशयितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दुपारपर्यंत ते कार्यकर्त्यांसह करमाळा पोलिस ठाण्यात उपस्थित होते. संशयितांवर गंभीर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांची होती. माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, जगताप गटाचे शंभूराजे जगताप, भाजपचे गणेश चिवटे, जगदीश अग्रवाल, रामा ढाणे आदी उपस्थित होते.
चिवटे हे करमाळा पोलिस ठाणे परिसरात असतानाच बागल गटाचे समर्थक रमेश कांबळे यांनी बागल गटावरचे चिवटे यांनी केलेले आरोप फेटाळले. त्यानंतर दिग्विजय बागल यांनीही तत्काळ ३ वाजता पत्रकार परिषद घेतली. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धंनजय डोंगरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तेव्हा त्यांनी चिवटे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चिवटे काय म्हणाले…
‘माझ्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला झाला. त्यात आई कमलाभवनीच्या व सर्वांच्या आशीर्वादामुळे हल्ल्यातून मी वाचलो आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी पोलिस ठाण्यात आलो आहे. मात्र माझ्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये घालण्याची धमकी दिली जात आहे. मी सुज्ञ असून कायदा मानणारा आहे. मी कोणालाही जातीवाचक बोलत नाही. ज्याने मला मारहाण केली त्याला मी ओळखतही नाही. तो कुठला आहे? त्याची जात काय याची काहीही माहिती नाही. मात्र तरीही जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्याची बागल गटाकडून धमकी दिली जात आहे. या धमकीला मी घाबरत नाही. त्यांनी खोटा गुन्हा दाखल केला तरी चालेल मी तुरुंगात बसायला तयार आहे. पण सत्याची बाजू सोडणार नाही. मी माझी तक्रार देऊन आलो आहे’, असे चिवटे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
दिग्विजय बागल काय म्हणाले…
‘चिवटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आणि माझा व रश्मी बागल यांचा काहीही सबंध नाही. रश्मी बागल या पुण्यात आहेत. तर मी झोपीतून उठलोही नव्हतो तेव्हा मला चिवटे यांच्यावर हल्ला झाल्याचा मंगेश चिवटे यांचाच फोन आला. तेव्हा याची माहिती समजली. मी पूरग्रस्त भागात भेटी देण्यात व्यस्त आहे. ते विनाकारण माझ्यावर आरोप करत आहेत. गेल्यावेळीही माझा काहीही सबंध नसताना माझ्याविरुद्ध तक्रार केली. सध्या माजी आमदार जयवंतराव जगताप हे शिवसेनेत आहेत. आणखी काहीजण प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पक्ष वाढत आहे. याचा मला आनंद आहे. यामुळे आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट होत आहेत. मात्र चिवटे हे मला टार्गेट करत आहेत. चिवटे परिवार आणि आमचे खूप जुने सबंध आहेत. मात्र ते मला का टार्गेट करत आहेत हे कळलेले नाही. पैशाच्या व्यहवारातून त्यांच्यात मारहाण झाली असल्याचे मला समजले आहे. मात्र त्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरु आहे,’ असे दिग्विजय बागल यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.