करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘असले भाऊ नसलेले बरे’, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रवी राणा यांनी केलेल्या विधानावर कडक शब्दात टीका केली आहे. करमाळा येथे आज (मंगळवार) शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा झाली.
खासदार सुळे म्हणाल्या, ‘सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. यामध्ये १५०० रुपये दिले जाणार आहेत. मात्र ही योजना का आणली आहे याचे कारण आता समोर येऊ लागले आहे.’ आमदार रवी राणा म्हणत आहे मतदान केले नाही तर हे पैसे आम्ही परत घेऊ. यावर खासदार सुळे म्हणाल्या, ‘आम्ही या भावांकडे काहीही मागायला गेलो नव्हतो. आता म्हणतायेत मत दिले नाही तर पैसे परत घेऊ. तुम्ही पैसेच घेऊन दाखवा मग पहाते. सरकारच्या योजनेचा एकही पैसे या आमदाराला परत देणार नाही. हे काही कोणाच्या खिशातील पैसे नाहीत. आम्ही स्वाभिमानी बहिणी आहोत. बहीण भावाचे नाते हे पंधराशे रुपयाने जोडता येत नसते. हे पैसे सरकारने कर रूपाने आपल्याकडून वसूल केले आहेत.’
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, ‘पक्ष चिन्ह हे मागितले असते तर प्रेमाने दिले असते. आम्ही नैतिकतेचे राजकारण करत आहोत. हे सरकार जुमलेबाज आहे. धनगर समाजाला हे सरकार पहिल्या कॅबेनेटमध्ये आरक्षण देणार होते. पण आरक्षण दिले नाही. ऑक्टोबरमध्ये आपल्याला सरकार बदलायचे आहे. आपल्याला आपले सरकार आणायचे आहे.