करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीत रजपूत समाजाच्या लोकप्रतिनिधीत्वासाठी प्रयत्नशील असलेले अमोल परदेशी यांनी समर्थकांसह करमाळा शहर विकास आघाडीच्या सावंत गटात प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीत जगताप गटाला हा धक्का असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान सावंत गटाने प्रवेश होताच विक्रमसिंह परदेशी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. याचा कसा परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.
करमाळा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये रजपूत समाजाचे प्राबल्य आहे. समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी समाजाचा लोकप्रतिनिधी असावा, अशी त्यांची मागणी आहे. ते अनेक वर्षांपासून जगताप गटात सक्रिय होते. २०२५ च्या नगरपालिका निवडणूकीत जगताप गटातून त्यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र येथे जगताप गटाकडून डावलले जाऊ शकते अशी शंका निर्माण झाल्याने त्यांनी समाजासह प्रभागातील समर्थकांना बरोबर घेऊन सावंत गटात प्रवेश केला आहे.
यावेळी सावंत गटाचे जेष्ठ मार्गदर्शक विठ्ठल सावंत, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत, हमाल पंचायतचे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत, सुनील सावंत, माजी नगरसेवक संजय सावंत, शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख प्रवीण कटारिया, रवींद्र जाधव, माजी नगरसेवक रविंद्र कांबळे, अजिज तांबोळी, हुमरान मुलाणी, शंकर हवालदार, संग्राम देशमुख आदी उपस्थित होते.
