करमाळा (अशोक मुरूमकर) : एका खासगी स्लीपर कोच ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशी झोपल्याचा फायदा घेऊन चिमुकलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये साधारण ३५ वर्षाच्या संशयित आरोपीला करमाळा पोलिसांकडून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली असल्याची माहिती आहे. यातील पीडित व संशयित आरोपी बाहेरच्या राज्यातील आहे. संशयित गुन्हेगारावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून याप्रकारमुळे खासगी ट्रॅव्हल्समधील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अहिल्यानगर ते टेंभुर्णी महामार्गावरून एक बाहेरच्या राज्यातील ट्रॅव्हल्स जात होती. रात्र झाल्यानंतर गाडीतील प्रवाशी झोपले होते. दरम्यान पीडित चिमुकली पाणी पिण्यासाठी वरील सीटवरून खाली आली तेव्हा संशयित आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. प्रवासावेळी चिमुकलीचे आई वडील व इतर नातेवाईकही गाडीत होते. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तत्काळ चालकाने पोलिस ठाणे जवळ केले. त्यानंतर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात ही गडी गेली. मात्र संबंधित प्रकार करमाळा पोलिस ठाणे हद्दीत झाल्याने पुन्हा ही गाडी करमाळा पोलिस ठाण्यात आली, अशी माहिती मिळालेली आहे. यातील संशयित गुन्हेगाराला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.
