करमाळा (सोलापूर) : कर्नाटकातील जैन साधू हत्याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी करमाळ्यातील सकल जैन समाज बांधवाच्या वतीने उद्या (गुरुवारी) दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. या बंदला सावंत गटाने पाठींबा दिला आहे. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास जैन मंदिर येथून समाज बांधवाच्या वतीने मुक मोर्चा काढला जाणार आहे. त्यानंतर तहसील कार्यालय येथे निवेदन दिले जाणार आहे.
कर्नाटकमध्ये परमपूज्य आचार्य श्री 108 कामकुमारनंदजी मुनिराज यांची हत्या झाली होती. या यामुळे समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. या हत्येचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. जैन धर्म, जैन समाज तसेच जैन तीर्थक्षेत्राच्या संरक्षणासाठी सर्व राज्यात अल्पसंख्यांक आयोग व जैन कल्याण बोर्ड स्थापन करून त्यामध्ये जैन समाजाला सामावून घेण्यात यावे, अशीही मागणी समाज बांधवांची आहे.
करमाळ्यात निघणारा मोर्चा व बंदला सावंत गटाचे माजी नगरसेवक संजय सावंत यांनी निषेध करत पाठिंबा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी सकल जैन समाज यांना दिले आहे. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता जैन मंदिर येथून मुक मोर्चा निघणार असून गुजर गल्ली, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, दत्त पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून तहसील कार्यालय येथे हा मोर्चा जाणार आहे. तेथे पोलिस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतर मेन रोड, दत्त पेठ, गुजर गल्ली येथील जैन समाज बांधव, गुजर समाज बांधव व मारवडी समाज बांधव यांची दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. जन सामान्य नागरिकांना त्रास न होता हा बंद ठेवला जाणार आहे, असे सांगण्यात येत आहे.