करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्ह्यात सध्या १०० रुपयांच्या स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली असून हे स्टॅम्प त्वरित उपलब्ध करून द्यावेत अशी, मागणी नागरिकांची आहे. दरम्यान करमाळा येथील उपकोषाधिकार कार्यालयाने याबाबत सोलापूर कोषाधिकार कार्यालयास कळवले असून पुढील आठवड्यात हे स्टॅम्प उपलब्ध होतील, असे उपकोषाधिकारी आर. पी, शिंदे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मुद्रांक शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १०० रुपयाच्या स्टॅम्पला ५०० रुपये नागरिकांना मोजावे लागणार आहेत. मात्र सरकार निर्णयाप्रमाणे प्रतिज्ञापत्र व जमीन वाटपासाठी याच स्टॅम्पचा वापर केला जात आहे. सध्या हे स्टॅम्प मिळत नसल्याने नागरिकांना जादा पैसे मोजावे लागत असून गैरसोय होत आहे. २१ जानेवारीपासून करमाळ्यात १०० रुपयांचे स्टँप मिळत नाहीत. याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या, ‘१०० रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र, वाटप व जबाबासाठी आवश्यक आहेत. ही कामे अजूनही याच स्टॅम्पवर सुरु आहेत.’
उपकोषाधिकारी शिंदे म्हणाले, ‘करमाळ्यात १०० रुपयांचे स्टँप संपलेले आहेत. मात्र याची मागणी केलेली आहे. सध्या उपलब्धतेनुसार हे स्टॅम्प मिळत आहेत. 100 चे 35 हजार व 500 चे 10 हजार अशी मागणी वरिष्ठांकडे केलेली आहे. ५०० रुपयांचा स्टॅम्प उपलब्ध आहेत.’ करमाळ्यात महिन्याला साधणार १०० चे पाच हजार स्टॅम्पची आवश्यकता असते.
घरकुलासाठी स्टॅम्पची आवश्यकता नाही
सध्या पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाच्या मंजुरीची प्रक्रिया सुरु आहे. पूर्वी त्यासाठी १०० रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञानपत्र आवश्यक होते. मात्र आता याची आवश्यकता नाही. स्वयंघोषणपत्रही चालत आहे. याबाबत सर्व ग्रामसेवकांना सूचना दिल्या आहेत, असे गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांनी सांगितले आहे.