श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्गावरून (कंदर) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरीला जात असलेले श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा करमाळा तालुक्यातील आजचा (शुक्रवार) तिसरा मुक्काम आहे. कंदर येथे पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले. येथे आकर्षक रंगोळीने रस्ते सजले होते. चौकातील श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधत होती.
सोलापूर जिल्ह्यात पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यापासून प्रशासन वारकऱ्यांची व्यवस्था करत आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत हे स्वता: या पालखी सोहळ्यात लक्ष ठेऊन आहेत. यावर्षी वरकऱ्यांसाठी हायटेक सुविधा देण्यात येत आहेत. त्यातूनच महिला वरकऱ्यांसाठी तात्पुरती स्नानगृह उभारण्यात येत आहेत. त्यात शावरही उभारण्यात आले आहेत.
सध्या उन्हाचा चटका जास्त आहे. पाऊस लांबल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी प्रशासनाने टँकर भरण्यासाठी काही ठिकाणे निश्चित केली आहेत. मात्र कंदर भागात उजनीचे पाणी मोठ्याप्रमाणात आहे. या भागात तत्पुरते उभारण्यात आलेल्या स्नानगृहात नळी टाकून शावर बसवण्यात आले आहेत. त्याला कॉक बसवण्यात आले आहेत.
कंदरमध्ये चार्जिंग पॉईट
वारकऱ्यांची मोबाईल चार्जिंगसाठी गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने चार्जिंग पॉईट उभारले आहेत. त्यात एकाचवेळी 40 मोबाईलला चार्जिंग होत आहे. येथे सेवेसाठी एकजण कायमस्वरूपी व्यक्ती आहे.