सभासद व कामगारांना न्याय देण्यासाठी शिंदे ‘आदिनाथ’च्या रिंगणात : प्रशांत पाटील

करमाळा (सोलापूर) : ‘तालुक्यातील शेतकऱ्यांची अस्मिता असलेल्या आदिनाथ साखर कारखान्याचे हीत डोळ्यासमोर ठेऊन सभासद व कामगारांना न्याय देण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत’, असे प्रत्युत्तर शिंदे गटाचे समर्थक प्रशांत पाटील यांनी आमदार नारायण पाटील यांच्या आरोपाला दिले आहे.

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. माजी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती आदिनाथ बचाव पॅनल तर आमदार पाटील यांच्या नेतृत्वखाली आदिनाथ संजीवनी पॅनल यांच्यात प्रमुख लढत होत आहे. प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली देखील तिसरा पॅनल आहे. यामध्ये माजी आमदार शिंदे व आमदार पाटील यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत.

‘कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी माजी आमदार शिंदे हे आदिनाथच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत’, असा आरोप आमदार पाटील यांनी कंदर येथील प्रचार सभेत केला होता. त्याला शिंदे गटाच्या महायुती आदिनाथ बचाव पॅनलचे उमेदवार प्रशांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘आदिनाथ कारखाना सुरु करण्याची क्षमता माजी आमदार शिंदे यांच्याकडे आहे. विरोधी पॅनलचे उमेदवार आणि त्यांचे पॅनल प्रमुख यांच्याकडे कारखाना सुरु करण्याविषयी कोणतेही धोरण नाही. कोणताही प्लॅन नाही. त्यामुळे विरोधी उमेदवार हे सभासद व कामगारांना फसविण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत,’ असा प्रतिआरोपही त्यांनी केला आहे.

‘सुज्ञ सभासदांना या दोन्ही पॅनलमधील फरक माहित आहे’, असे म्हणत ‘माजी आमदार शिंदे यांनी स्वतःचा कारखाना विकला’ या आमदार पाटील यांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले आहे. प्रशांत पाटील म्हणाले, ‘ज्यांच्या हस्ते आमदार पाटील यांच्या पॅनलचा प्रचार शुभारंभ झाला ते मोहिते पाटील यांनी दोन साखर कारखाने विकले आहेत. एक साखर कारखाना सरकारच्या मेहरबानीने चालत आहे. सहकारमहर्षी कारखाना हा शेजारच्या श्रीपुर आणि विठ्ठलराव, माळीनगर या कारखान्यापेक्षा टनाला ३०० रुपये दर कमी देत आहे. यामुळे सहकार महर्षीच्या सभासदांनी अन्यायाला आणि जाचाला कंटाळून विठ्ठलराव शिंदे, पांडुरंग श्रीपुर, गिरमे माळीनगर आणि माजी खासदार निंबाळकर यांच्या कारखान्याला ऊस देईला सुरुवात केली आहे,’ असे प्रशांत पाटील म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *