करमाळा (अशोक मुरूमकर) : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील (ता. शिरोळ) माधुरी (महादेवी) हत्तीणीची घरवापसी व्हावी म्हणून ठिकठिकाणी जनआक्रोश सुरु झाला आहे. त्यालाच पाठींबा देण्यासाठी करमाळ्यातही आज (रविवार) श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे शिवजयंती उत्सव समिती शहर व ग्रामीणच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. अंबानी समूहाच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचाही यावेळी निर्णय झाला आहे. तसे फलक स्वाक्षरी मोहिमेवेळी झळकले.
न्यायालयाच्या आदेशाने जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या नांदणी मठातील हत्तीणीची गुजरातमधील वनताराकडे रवानगी करण्यात आली. तेव्हापासून सर्वत्र तीव्र भावना व्यक्त केल्या जात असून हत्तीणीला परत आणण्यासाठी जनआक्रोश सुरू झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत हत्ती परत मठामध्ये परतला पाहिजे तोपर्यंत ही मोहीम सुरु ठेवली जाणार आहे. हा जनआक्रोश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. वेळीच याची दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
जैन समाज हा मुंगीची सुद्धा हत्या करत नाही मग हत्तीणीला कसकाय त्रास देईल. काहीतरी दिशाभूल केली जात आहे. महादेवी हत्तीणीला अतिशय प्रमाणे सांभाळले जात होते. बाजारात फिरत असताना ती सर्वांना आशीर्वाद देत होती. सर्वांचीच ती प्रिय होती. तिला पाठवण्यात आले तेव्हा तिच्याही डोळ्यात अश्रू आल्याचे व्हिडिओत सर्वांनी पाहिले. हा अन्याय दूर झाला पाहिजे. जनशक्ती ही धनशक्तीपेक्षा श्रेष्ठ ठरणार आहे.
महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान व जिव्हाळ्याचे नाते असणारी महादेवी हत्तीण नांदणी मठाकडे परत यावी, अशी कळकळीची जनभावना स्वाक्षरीधारकांनी व्यक्त केली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व भगवान महावीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या मोहिमेची स्वरुवात झाली. यावेळी जिओ पोर्ट करण्याची मोहीम देखील राबविण्यात आली. यावेळी सर्वधर्मीय बांधव उपस्थित होते.
– डॉ. सुनीता दोषी, करमाळा
महादेवी हत्तीणीबाबत काही प्राणिमित्रांनी चुकीची माहिती दिली. त्यामुळे न्यायालयाने आदेश देत तिचे स्थलांतर झाले. तिला वनतारामध्ये पाठवण्यात आले. मात्र आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत. हत्तीणीचा मठात कोणताही छळ झालेला नाही. या घटनेमुळे सर्व समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. यातूनच आम्ही काळ्या फिती बांधून याचा निषेध करत आहोत.
– बबन चांदगुडे
जैन समाजाबरोबर सर्व समाज आहे. नांदणी मठात महादेवी हत्तीणीचे व्यवस्थित संगोपण केले जात होते. मात्र कोणालातरी खुश करण्यासाठी चुकीची माहिती देण्यात आली. आता धनशक्तीला हरवण्यासाठी जनशक्तीची गरज आहे. हेच लक्षात आल्यानंतर पुन्हा या हत्तीणीला आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र जोपर्यंत महादेवी मठात येत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.
– प्राचार्य मिलिंद फंड
कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणी हा अस्मितेचा विषय आहे. त्या हत्तीणीला परत आणले पाहिजे. या मठात तिचा कोणताही छळ झालेला नाही. न्यायालयात चुकीची माहिती देण्यात आली. महादेवी हत्तीणीला वनतारा येथे नेल्याने जनभावना दुखावल्या आहेत. समाजबांधव एकत्र येऊन या घटनेचा निषेध करत आहेत. आम्हीही सर्व समाजबांधवांबरोबर आहोत.
– ऍड. कमलाकर वीर
करमाळा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने महादेवी हत्तीणीला वनतारा येथून परत आणावे अशी मागणी आहे. नांदणी मठातील नागरिक आणि माधुरी हत्तीण यांचे एक अतूट नाते तयार झाले होते. तिचे स्थलांतर झाले याचा आम्ही निषेध करत आहोत. पेटाने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे हा न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. यापुढे आम्ही जिओचे कार्ड वापरणार नाही. पोर्ट केले आहे. येणाऱ्या काळात हत्तीण परत आली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल.
– सुनील सावंत
महादेवी हत्तीणीला गुजरातमध्ये नेले याचा आम्ही निषेध करत आहोत. यामध्ये करमाळ्यातील सर्व समाजबांधव एकत्र आले आहेत. या हत्तीणीचे आणि सर्व समाजबांधवांचे एक अतूट नाते निर्माणज झाले होते. मात्र धनशक्तीमुळे या हत्तीणीचे स्थलांतर झाले. तिला त्वरित सुखरूपपणे नांदणी मठात आणावे अन्यथा आणखी तीव्र आंदोलन केले जाईल.
- प्रवीण कटारिया