करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील हिवरवाडी परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात सहा प्राण्यांवर हल्ला करून त्याने कुत्री व वासरे फस्त केली आहेत. यामध्ये मांगीत दोन वासरे व दोन कुत्री, हिवरवाडीत दोन कुत्री व वडगावमध्ये कुत्रा व वासराचा समावेश आहे. या हल्ल्यामुळे जातेगाव, पुनवर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने त्याला पकडण्यासाठी लावलेला पिंजराही काढून नेला आहे. वनविभागाच्या या कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
करमाळा तालुक्यात काही दिवसांपूर्वी मांगी परिसरात बिबट्या दिसला होता. त्यानंतर वनविभागाने तातडीने पाहणी करून तो बिबट्याच असल्याचे जाहीर केले होते. त्याला पकडण्यासाठी पिंजराही लावला. मात्र काही दिवसातच त्याला न पकडता पिंजरा नेला असल्याचे या परिसरातील नागरिक सांगत आहेत. हिवरवाडी परिसरात या बिबट्याने दहशत निर्माण केली असून १५ दिवसात दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून फस्त केली आहेत. वडगाव येथेही त्यांने कुत्री फस्त केली आहेत. या बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
हिवरवाडी येथील गणेश इवरे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून येथे बिबट्याचा वावर असताना वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. बिबट्याला न पकडता या परिसरातून पिंजरे नेले आहेत. बिबट्याच्या वावरामुळे कुत्र्यांची संख्या कमी झाली आहे. नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाऊसाहेब पवार म्हणाले, बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकरी शेतातही पिकांना पाणी देण्यासाठी जात नाहीत. पाऊसही मोठा झालेला नाही. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. याकडे वनविभागाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीने या भागात शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा.
शेतकरी दत्तात्रय पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून बिबट्याबाबत वनविभागाला माहिती दिली जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाड्यावस्त्यांवरून शाळेतील मुलं गावात चालत येतात. त्यांना यापासून धोका आहे. एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावरच वनविभाग याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.