पोलिस म्हटलं की अनेकांचा त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. अशा स्थितीत सामाजिक बांधिलकी जपत करमाळा पोलिसांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरीला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना शुद्ध व थंड पाण्याची व्यवस्था केली होती. पाणी वाटपासाठी आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी त्यांनी नगर- टेंभुर्णी मार्गावर जातेगाव येथे कक्ष उभारला होता. वारकऱ्यांना अडचण आली तर तेथून मदतही केली जात होती.
आषाढी एकादशी नुकतीच झाली. पंढरपुरला येऊन लाखो वारकऱ्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. वेगवेगळ्या भागातून वारकरी दरवर्षी पंढरपूरला चालत येतात. मनाच्या पालख्यांमध्ये वारकऱ्यांना प्रशासन सर्व सुविधा देते. मात्र पालखी मार्गाशिवाय इतर मार्गानेही हजारो वारकरी पंढरपूरला येतात. त्यापैकीच एक म्हणजे नगर- टेंभुर्णी मार्ग! या मार्गावरून मोठ्याप्रमाणात वारकरी दिंड्यांच्या माध्यमातून करमाळा मार्गे पंढरपूरकडे जातात.
या वर्षी पाऊस लांबल्याने पाणी टंचाई जाणवत आहे. श्री. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा रावगाव मार्गे जातो. त्याशिवाय नगर व जामखेड रस्त्यानेही अनेक वारकरी जातात. पाणी टंचाईमुळे यावर्षी प्रशासनाने पाणी टँकर भरण्यासाठी काही ठिकाणे निश्चित केलेली होती. त्यात करमाळा नगरपालिका पाणी पुरवठा येथेही अनेक टँकर भरले जात होते. मात्र चालून थकलेल्या वारकऱ्यांना थंड आणि शुद्ध पाणी मिळावे याची व्यवस्था करमाळा पोलिसांनी जातेगाव येथील जिल्हा हद्दीवर केली होती.
पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या संकल्पनेतून ही व्यवस्था करण्यात आली होती. येथे मंडप उभारून मदत कक्ष स्थापन केला होता. तेथे रोज ५० ते ६० जार थंड पाण्याचे ठेवण्यात येत होते. वरकऱ्यांना पाणी देण्यासाठी आणि त्यांना अडचण आली तर मदतीसाठी पोलिस पाटील व पोलिस अधिकारी तेथे उपलब्ध होते. या कामातून पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. आषाढीचा बंदोबस्त असताना करमाळ्यात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा दौरा झाला हा दौराही कमी पोलिस असताना यशस्वी करण्यात यश आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.