करमाळा (अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आज (शुक्रवार) करमाळ्यात टंचाईच्या पार्श्वभूमीवर जेऊर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पहाणी केली. विशेष म्हणजे ही पहाणी करताना त्या स्वता टाकीवर चढल्या आणि काहीही करून ही योजना सुरू झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करेन असं सांगितले आहे. ही योजना सुरू झाली तर 29 गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. सध्या टँकर सुरू करायचे म्हटले तरी पाणी भरणीसाठी फीडिंग पॉईंट नाहीत मात्र ही योजना सुरू झाली तर पाणी भरण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे या आज करमाळा दौऱ्यावर आल्या होत्या. जेऊर प्राधिकरण योजनेला जेथून पाणी येथे ते ठिकाण म्हणाजे उजनी जलाशयाचा दहिगाव येथील बकवॉटर भाग! या ठिकाणावरून त्यांनी दौऱ्याची सुरुवात केली. त्यांनी तेथील पहाणी करून जेऊर येथील साडे, केम व सालसे रस्त्यावरील मुख्य टाकी असलेल्या ठिकाणाची पहाणी केली. ही पहाणी करताना टाकीवर जाऊन तेथील वास्तव चित्र त्यांनी पाहिले. यावेळी करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
जेऊर प्राधिकरण योजनेचे सध्या अडीच कोटी रुपये वीज बिल थकीत आहे. ही योजना सुरू झाली तर 29 गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. शिवाय या भागातील गावांसाठी टँकर भरणीसाठी ठिकाण होणार आहे. या भागात टँकर भरायला देखील पाणी उपलब्ध नाही. जेथे पाणी आहे तेथे वीज नाही. मात्र जेऊर प्राधिकरण योजना सुरू झाली तर पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकणार आहे.
आव्हाळे यांनी उंदरगाव, गोयेगाव, हिंगणी, जिंती, कोंढरचिंचोली या गावांना भेटी दिल्या. हिंगणी येथील पाणी पुरवठा योजनेचीही त्यांनी पहाणी केली. गोयेगाव व कोंढरचिंचोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भेटी देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बचत गटातील महिलांशी संवाद साधून त्यांनी बायोगॅस निर्मितीबाबत मार्गदर्शन केले.
जिंती येथे आव्हाळे यांच्या उपस्थितीत आयुषग्राम समिती, जिल्हास्तरीय आयुषग्राम समिती व करमाळा मेडिकोज गिल्डच्या वतीने महिला आरोग्य जनजागृती मेळावा झाला. यामध्ये साधारण 400 महिलांची तपासणी करण्यात आली. प्रोजेक्ट निदान अंतर्गत जिल्हा परिषद मार्फत स्तनाच्या कॅन्सरची तपासणी यावेळी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब गाढवे, डॉ. सिमरण पठाण, डॉ. कोमल शिर्के, डॉ. सुहास माने, डॉ. विलास सरवदे, डॉ. संतोष नवले, डॉ. श्रीकांत नवले, डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. स्वाती घाडगे, डॉ. अमोल घाडगे, सवितादेवी राजेभोसले, सुहास गलांडे, डॉ. कविता कांबळे आदी उपस्थित होते.