करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या जेऊर स्थानकावर सोलापूर – अजमेर या गाडीला थांबा देण्याबाबत सोलापूर मंडलने मुंबईतील मुख्य कार्यालयाला सकारात्मक अहवाल दिला आहे. आमदार नारायण पाटील यांनी याबाबत मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडल यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती.
जेऊर रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक ०९६२७ – ०९६२८ सोलापूर – अजमेर एक्स्प्रेस या साप्ताहिक रेल्वे गाडीस थांबा मिळणे आवश्यक आहे. मध्य रेल्वे सोलापूर मंडलचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांनी जेऊर रेल्वे स्थानकावर अजमेर- सोलापुर- अजमेर या गाडीचा थांबा दिला जावा का? याची पडताळणी केली. ‘अहवालानुसार आपली मागणी व्यवहार्य असल्याचे दिसुन आले’ असुन पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी मध्य रेल्वे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांना अहवाल पाठवला आहे. या गाडीला थांबा मिळाल्यास दळणवळणाची सोय होणार आहे.