सीना नदी काठाकडे आमदार संजयमामा शिंदे यांचे विशेष लक्ष आहे. तालुक्याचा सर्वांगीण विकास करताना त्यांनी शेतकरी आर्थिक दृष्ट्या सदृढ कसा होईल याबाबत प्रयत्न केला असल्याचे दिसत आहे. यातूनच सिना नदीवरील पोटेगाव बंधारा दुरुस्तीसाठी त्यांनी 4 कोटी निधी मिळाला आहे. तर संगोबा बंधाऱ्याची दुरुस्ती त्यांच्याच प्रयत्नाने झालेली आहे. तरटगाव व संगोबा या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे लातूर पॅटर्न बंधाऱ्यांमध्ये रूपांतरित करण्यासाठी त्यांनी प्रस्ताव दिला आहे. स्व. डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांनी याची आग्रही मागणी केली होती.
सीना नदीवरील पोटेगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी विशेषबाब म्हणून ४ कोटी ८ लाख ११ हजार ९४४ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्याने हा निधी मंजूर झाला. पोटेगाव, बिटरगाव श्री, बाळेवाडी, निलज, तरटगाव व पोथरे येथील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सीना नदीवर करमाळा तालुक्यातील खडकी, तरटगाव, पोटेगाव व संगोबा हे कोल्हापूर पद्धतीचे लघु पाटबंधारे आहेत. यामध्ये पोटेगाव बंधारा असूनही उपयोग नव्हता. त्यामध्ये पाणी गळती होत होती. पोटेगाव बंधारा हा महत्त्वाचा बंधारा आहे. सिंचन बजेटमधून त्याला दुरुस्ती करण्यास निधी उपलब्ध नसल्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांना विस्तार सुधारमधून त्याचा प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पोटेगाव बंधाऱ्याची पाहणी केली होती. कार्यकारी समितीच्या १६६ व्या बैठकीत सदर प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन प्रस्ताव नियामक मंडळापुढे मांडण्यासाठी सादर करण्यात आला होता. जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळाची बैठक होत नसल्यामुळे विषय प्रलंबित होता. या बंधार्याचा फायदा पोटेगाव, बाळेवाडी, पोथरे, बिटरगाव श्री, तरटगाव व निलज या गावांना होणार असून यामुळे ८१५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
पोटेगाव बंधाऱ्यासाठी २१ एप्रिल १९८१ च्या सरकार निर्णयानुसार २४ लाख ६१ हजार खर्चास प्रशासकीय मान्यता होती. जानेवारी १९८८ मध्ये हे काम सुरू होऊन ऑगस्ट १९९० मध्ये पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर प्रकल्प सिंचन व्यवस्थापन विभागाकडे १९९३ मध्ये हस्तांतरित करण्यात आला होता. तेंव्हापासून हा बंधारा दुरूस्तीच्या प्रतिक्षेत होता. आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्याने संगोबा येथे दशक्रियाविधीसाठी घाटही मंजूर झाला.
सिना नदीवरील संगोबा, पोटेगाव व तरटगाव हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. त्याचे रूपांतर लातूर पॅटर्न (बॅरगेज) मध्ये व्हावे यासाठी स्व. डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांनी आमदार शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. त्याची तत्काळ दखल घेत आमदार शिंदे यांनी सबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला. त्यानुसार त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.