करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळ या संस्थेला कोल्हापूरमध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथे शिक्षक मेळावाही संपन्न झाला. राज्याचे कुटुंब कल्याण आरोग्य मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भास्कर महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा पुरस्कार व शिक्षक मेळावा झाला.
महाविद्यालयाची गुणवत्ता, कार्यपद्धतीवर आधारित हा पुरस्कार प्राधान करण्यात आला. महाराष्ट्रातील 40 संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला. विद्या विकास मंडळ या संस्थेचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आहे. या संस्थेमध्ये के. जी. ते पी. जी. पर्यंत शिक्षण दिले जाते. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.
एनसीसी व एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजाची व देशाची सेवा करण्याचे बाळकडू दिले जाते. त्यामुळे या संस्थेचा समावेश पुरस्कारामध्ये होता. हा पुरस्कार संस्थेचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड व संस्थेचे सदस्य यांच्या वतीने संस्थेचे विश्वस्त कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक व राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी स्वीकारला. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष कळजे, व्याख्याते गणेश शिंदे, उपमुख्यमंत्री आरोग्य कक्षाचे मंगेश चिवटे, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. बापूसाहेब आडसूळ, पंढरपूरचे वासकर महाराज उपस्थित होते.