करमाळा (सोलापूर) : गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख राजकुमार खाडे होते. यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील, डॉ. विशाल शेटे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सार्थक सूर्यवंशी, अथर्व बरिदे, मेघराज शिंदे, शर्वरी सपकाळ या विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रा. शिंदे यांच्याकडून विशेष सत्कार करण्यात आला.
शाळेत विद्यार्थ्यांनी ‘आकाशगंगा, जिवंत देखावा’ सादर केला. विद्यार्थ्यांना अवकाशातील सर्व ग्रह, ग्रहांचे स्थान, अवकाशात होणारे निरनिराळे आवाज, ग्रहांची फिरण्याची गती, कक्षा परिवलन, परिभ्रमण, सर्वात मोठा ग्रह, लहान ग्रह याविषयी सखोल ज्ञान या आकाशगंगेमुळे मिळाले. विद्यार्थ्यांनी बोलणारा रोबोटही बनवला होता. त्याने सर्वांचे लक्ष वेधले.
विज्ञान प्रदर्शनात 90 प्रयोग सादर करण्यात आले होते. 423 विद्यार्थ्यांनी हे प्रयोग सादर केले. भाजी मार्केटमध्ये 370 विद्यार्थी व फळ विक्रीमध्ये 120 विद्यार्थी तर खाद्यपदार्थ विक्रीमध्ये 370 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. भाजी मार्केट व फूड स्टॉलमध्ये 1 लाख 75 हजाराची उलाढाल झाली. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आकाशगंगा साकारण्याची कल्पना मांडून ती प्रत्यक्षात साकारण्याचे काम भगत मॅडम, शिंदे सर व जगताप सर यांनी केले. शाळेचे संस्थापक नितीन भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन झाले.