करमाळा (सोलापूर) : नियमित व्यायाम व गडकिल्ल्यांवरील ट्रेकींगचा सराव यामुळे एव्हरेस्ट सर करण्यात यशस्वी ठरलो, असे प्रतिपादन कोंढेज (ता. करमाळा) येथील एव्हरेस्टवीर शिवाजी ननवरे यांनी ग्रामस्थांच्या सत्काराला उत्तर देताना केले.
पुणे ग्रामीण पोलिस दलात नोकरी करत असलेले कोंढेज येथील पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकवला. त्यांच्या या कामगीरीबद्ल ग्रामस्थांच्या वतीने वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर सडा रांगोळी काढून व औक्षण करून त्याचे स्वागत केले. भैरवनाथ मंदिर मैदानावर त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच सव्वाशे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत केले. राम मंजुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर प्रा. नंदकिशोर वलटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी समीर पटेल, श्रीराम आदलींग यांची भाषणे झाली. सत्काराला उत्तर देताना ननवरे म्हणाले, एव्हरेस्टवरील चढाई सोपी नव्हती. ऑक्सीजन लेवल कमी होत असल्याने समोर साक्षात मृत्यू दिसत होता. परंतु तरीही परिस्थितीला सामोरे गेलो पोलिस दलात नोकरी करत असताना आपण काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती.
पुणे ग्रामीणकडे बदली झाल्यानंतर पुणे परिसरातील गडकिल्ल्यांवर ट्रेकींगला जाऊ लागलो यातून गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली व हा छंदच एव्हरेस्ट मोहीमेचे ध्येय बनला व सर्व अडचणींवर मात करून जिद्द चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर आपण ही मोहीम यशस्वी केली.यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला टायगर ग्रुपचे तानजी जाधव, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष नितीन खटके, यांच्यासह माजी सरपंच दादा लोंढे,शहाजी राऊत, सुभाष इंगोले, चंद्रकांत अदलिंग, राजेंद्र चांगण निलेश राऊत, गोविंद लोंढे, सुनिल सांगावे, संजय आदलींग, हरिभाऊ इंगोले, अमोल लोंढे, अनिल शेलार, सुहास अरणे.महावीर सामसे, महावीर बादल,रेवन्नाथ आदलींग, नितीन आदलींग सतिश मलंगनेर,नाना माने ग्रामस्थ व परिसरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.