करमाळा (सोलापूर) : विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार नारायण पाटील यांना पाठींबा दिलेले बळीराजा शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब सुपनवर भाजपात गेले आहेत. सुपनवर यांनी ‘बीआरएस’चेही काम केले होते. मात्र तेलंगणात या पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठींबा दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार पाटील यांना पाठिंबा दिला. या निवडणुकीत आमदार पाटील हे विजयी झाले देखील. मात्र आता त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पक्षीय राजकारणात त्यांच्या नेहमी सोईच्या भूमिका दिसत आहेत. मात्र आमदार पाटील यांना त्यांनी कधीही सोडलेले नाही.
आमदार पाटील यांचे ते समर्थक आहेत. आताही ते भाजपात गेले असले तरी त्यांनी पाटील यांची साथ सोडली आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला त्यांनी पाठींबा दिलेला होता. तरीही त्यांची भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्यावरली निष्ठा कायम होती असे चित्र होते. सुपनवर हे आता भाजपात गेले असले तरी पुढील राजकारणात त्यांची काय भूमिका असेल हे स्पष्ट नसल्याची चर्चा आहे. बळीराजा शेतकरी संघटना व बीआरएसमध्ये असतानाही त्यांनी फार संघटना वाढवली नाही. मात्र त्यांच्यामुळे तालुक्यात संघटना असल्याचे दिसत होते. त्यांच्या खिशाला कायम संघटनेचा बिल्ला होता. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला किती मदत होईल याची चर्चा सुरु आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.