करमाळा (सोलापूर) : शेटफळ येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे शिवभक्तविरुद्ध प्रशासन असा संघर्ष निर्माण झाला होता. मात्र याची माहिती सर्वत्र पसरताच हजारो शिवभक्त एकत्र आले असून पुतळा हटवल्यास उद्रेक होईल, असा इशारा दिला आहे. माजी आमदार नारायण पाटील, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, जगताप गटाचे नेते शंभूराजे जगताप, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यासह अनेक गावातून शिवभक्त येथे दाखल होऊन गावकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
शेटफळ येथे २० वर्षांपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा होता. मात्र गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्याच ठिकाणी लोकवर्गणीतून अश्वरूढ पुतळा बसवला. मात्र याला परवानगी नसल्याने प्रशासनाने विरोध करत हा पुतळा हटवण्याची मागणी केली होती. याची माहिती शिवभक्तांमध्ये पोहोचल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. हा पुतळा हटवला तर सर्वत्र उद्रेक होईल, असा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान परिसरातील केडगाव, चिखलठाण, माढा तालुक्यातील पिंपळनेर, जेऊर, केम, कंदर, कुंभेज, सावडी आदी शिवभक्तांनी मोटारसायकलवर येऊन शेटफळ येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शेटफळकरांच्या पाठीशी असल्याचे जाहीर करत पुतळा हटवू नये, अशी भावना व्यक्त केली आहे.
या भागातील नेते बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके, पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय सरडे आदींनी येथे भेटी देऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आहे. शिवजयंती उत्सव समिती करमाळा शहर व तालुका यांनीही ‘आय स्पोर्ट शेटफळकर’ अशी सोशल मीडियावर मोहीम सुरु केली आहे.