करमाळा (अशोक मुरूमकर) : पाच वर्षांपासून मोक्काअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार दोन संशयित आरोपींना करमाळा पोलिसांनी अटक केली आहे. कापऱ्या उर्फ कापूरशेठ कोंगाऱ्या भोसले (वय ५५) व राजधान्या कोंगाऱ्या भोसले (वय ३८, दोघेही रा. निंभोरे, ता. करमाळा) अशी त्यांची नावे आहेत.
कोंबीग ऑपरेशन राबवूनही त्यांचा शोध लागत नव्हता. दरम्यान पोलिस निरीक्षक रणजित माने यांना गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज अभंग व गुन्हे प्रकटीकरण विभागातील अंमलदारांना सूचना देऊन ऊसात लपून बसलेल्या संशयितांना अटक केली. त्यांच्यावर अत्याचार व दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती देण्यात आला आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल अजित उबाळे, अर्जुन गोसावी, हनुमंत भराटे, रविराज गटकुळ, अमोल रंदिल, अमोल पवार आदींनी ही कारवाई केली.
