करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. इच्छुकांचे मतदारसंघात दौरेही वाढले आहेत. अशा स्थितीत माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीकडून अभयसिंग जगताप यांची नावे चर्चेत होती. आता राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला असून त्यांचेही नाव चर्चेत आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही या जागेवर दावा केला असून मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने महत्वपूर्ण बैठकी झाल्याची चर्चा आहे. यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही उमेदवारी देण्याची मागणी काही कार्यकर्त्यांकडून होत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत येथे रिंगणात कोण असणार यांची उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपकडून मोहिते पाटील व खासदार निंबाळकर यांनी मतदारसंघाचा दौरा केला आहे. त्यांचा प्रचारही कॅलेंडर देऊन सुरु आहे. मोहिते पाटील यांनी सुरुवातीला प्रत्येक घरोघरी कॅलेंडर दिले होते. आता निंबाळकर यांच्याही कार्यकर्त्यांकडून घरोघरी कॅलेंडर देत आकर्षित केले जात आहे. मार्च सुरु झाला तरी भाजपकडून २०२४ चे कॅलेंडर दिले जात आहे. यानिमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
रासपच्या अंगद देवकाते यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात जाऊन जानकर यांचे विचार पोहोचवले आहेत. छोट्या सभा घेऊन त्यांनी हा दौरा केला आहे. तर महाविकास आघाडीचे जगताप यांनी सुरुवातीला दौऱ्यात आघाडी घेतली होती. मात्र इतरांच्या तुलनेत ते कमी पडत असल्याचे दिसत आहेत. सुरुवातीला त्यांनी क्रिकेट सामने, खेळ पैठणीचा असे कार्यक्रम घेतले होते. त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार होता, तो मेळावाही रद्द झाला आहे. करमाळ्यात शरद पवार गटाचे संतोष वारे यांच्या माध्यमातून त्यांचा प्रचार सुरु आहे. मात्र येथे कोणाला उमेदवारी मिळणार हे निश्चित नसल्याचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
दोन दिवसांपासून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली आहे. भाजपचे काकासाहेब सरडे यांनी तर प्रसिद्धिपत्रक देऊन ही मागणीही केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत अवताडे यांनी येथील जागा राष्ट्रवादीला देण्याची मागणी केली आहे. ही जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी मुंबईत एक बैठकही झाली आहे. आणखी एक बैठक असून त्यासाठी करमाळ्यातून आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थकही गेले असल्याचे समजत आहे.