करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजुरी येथील बंद पडलेल्या गोविंदपर्व ऍग्रो प्रॉडक्स प्रा. लि. या गुळ पावडर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाचा प्रश्न पेटला आहे. या थकीत ऊस बिलाला दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ हे देखील जबाबदार असल्याचा आरोप करत लवकरच यासाठी आंदोलन उभा केले जाणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. याबाबत प्रा. झोळ यांनी अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाव सांगत त्यांच्या एका कार्यकर्त्याने काही माध्यमांकडे ‘प्रा. झोळ यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे’ सांगितले होते. त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील भूमिका बदलली असून आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.
‘पोलखोल’च्या माध्यमातून ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने करमाळा तालुक्यातील ‘गोविंदपर्व’बाबत प्रश्न उपस्थित केले होते. प्रा. झोळ यांनी याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती द्यावी’, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र अद्याप त्यांनी याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. शेतकरी मात्र या विषयाबाबत एकवटू लागले आहेत. ‘ज्या- ज्या शेतकऱ्यांचे गोविंदपर्व ऍग्रो प्रा. लि. कारखान्याकडे शेतकऱ्यांचे ऊस थकीत बिल, वाहतूक बिल, कर्मचारी पगार येणे बाकी आहे त्यांनी त्वरित संपर्क साधावा’, असे आवाहन धनंजय कांबळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
करंजे येथील शेतकरी सचिन सरडे म्हणाले, ‘गोविंदपर्व कारखान्याला आमचा १३२ टन ऊस गेला होता. मी कारखान्याकडे चिटबॉय म्हणून काम पाहत होतो. तेव्हा हा कारखाना प्रा. झोळ यांच्याकडे होता. प्रा. झोळ यांनी कारखान्याबाबत जबाबदारी झटकू नये. नुकताच त्यांनी नोकरी महोत्सव घेतला होता. तेव्हा याबाबत मी त्यांना बोललो होतो. मकाईबाबत त्यांनी आंदोलन केले तेव्हा आम्ही त्यांना विचारणा केली होती. त्यांच्याकडे अजून पैसे येणे बाकी आहे. त्यांचा कारखान्याशी संबंध नसेल तर त्यांनी आदिनाथ, मकाईबाबत जसे आंदोलन उभा केले तसे गोविंदपर्वबाबत आंदोलन उभा करावे. कारखाना तुमच्या सासऱ्याचा आहे म्हणून तुम्ही दुट्टपी भूमिका घेऊ नका’, असे आवाहन त्यांनी केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके म्हणाले, ‘आमचे वरिष्ठ विजय रणदिवे यांच्या आदेशाने आम्ही शेतकऱ्याचे ऊसबिल मिळावे म्हणून काम करत आहोत. गोविंदपर्वबाबत थकीत ऊसबिल असलेल्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा. त्यांचे बिल मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही प्रा. झोळ यांच्याकडून सर्टिफिकेट घेतले. मात्र या कारखान्यात त्यांचा संचालक वगैरे काही संबंध नाही. त्यावरून आमच्या एकाने प्रा. झोळ यांची बाजू घेतली. तरीपण जरी लिगली त्यांचा संबंध सापडला तरी आम्ही त्यांच्या विरोधात ही उभा राहिला तयार आहोत. शेतकऱ्यांची बिल मिळालीच पाहिजेत. आम्ही 2020- 21 मध्ये जामखेड तालुक्यातील 16 ते 17 शेतकऱ्यांची गोविंदपर्वची बिले काढून दिली आहेत.’