करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा- परंडा रस्त्यावर भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट व फॉर्च्युनरची समोरासमोर धडक होऊन एकजण ठार झाला आहे तर एकजण जखमी झाला आहे. आज (शुक्रवार) पहाटे २ वाजताच्या सुमारास फिसरेजवळ हा अपघात झाला. याची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. निवांत दशरथ अवसरे (वय 31, रा. इनगुदे, ता. परंडा, जि. धाराशिव) असे ठार झालेल्या व्यक्ती नाव आहे. तर अविनाश जाधव असे जखमीचे नाव असून त्याच्यावर पुण्यात उपचार सुरु आहेत.
अपघातातील जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेने दाखल केले होते. त्यात एकाला मृत घोषित केले तर दुसऱ्या जखमीवर पुण्यात उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. अवसरे हे स्विप्टने पुण्याकडे जात होते. दरम्यान फिसरेजवळ समोरून आलेल्या फॉर्च्यूनरची व त्यांच्या गाडीची जोराची धडक झाली. अवसरे हे चालकाच्या बाजूला बसले होते. या कारचे चालक जाधव होते. ते जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु आहेत. फॉर्च्यूनरचे चालक राज सपकाळ (रा. सालसे, ता. करमाळा) हे असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांकडून याचा तपास सुरु असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे समजत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त दोन्ही गाड्या पोलिसांनी करमाळा पोलिस ठाण्यात आणल्या आहेत. त्यात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून अपघाताचे नेमके कारण समजलेले नाही. अपघातग्रस्त फॉर्च्युनरमधील सर्व एअरबॅग्ज उघडल्या असल्याचे दिसत आहे.