करमाळा (सोलापूर) : अलिगड (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या 43 व्या राष्ट्रीय खो- खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अजिंक्यपद पटकावले. त्यामध्ये तन्वी भोसले हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करून ‘उत्कृष्ट संरक्षक’ सन्मान पटकावला. तन्वी भोसले ही कुंभेजची कन्या असून ती कुंभेज विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रवीण भोसले यांची पुतणी आहे.
इतर मागास बहुजन कल्याण धाराशिवचे निरीक्षक युवराज भोसले यांची ती कन्या आहे. तन्वी पाचवीपासून महाराष्ट्र खो- खो असोसिएशनचे सरचिटणीस चंद्रजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. तिचे हे तिसरे राष्ट्रीय प्राविण्य आहे. तिच्या यशाबद्दल महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अभिनंदन केले.