करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील तरटगाव बंधारा फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. सलग दोन दिवस मोठे पाऊस झाल्याने नदीपात्रात पाणी वाढले आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या बाजूने पाणी जात आहे. आता बंधाऱ्याची काही दारे काढण्याची आवश्यकता असून याकडे पाटबंधाऱ्याने लक्ष द्यावे, अन्यथा मोठे नुकसान होणार आहे. दरम्यान येथील शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसह आमदार संजयमामा शिंदे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा येथील तत्काळ पहाणी केली जाणार असल्याचे सांगितले. आमदार शिंदे म्हणाले, तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करण्याबाबत सूचना दिली आहे.
सीना नदीवर करमाळा तालुक्यात खडकी, तरटगाव, पोटेगाव व संगोबा हे बंधारे आहेत. सध्या खडकी येथील बंधाऱ्यावरून पाणी पडत आहे. तर तरटगाव बंधाऱ्याच्या बाजूने पाणी जात आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. या बंधाऱ्याच्या बाजूला बिटरगाव श्री येथील शेतकरी भारत माने यांचे क्षेत्र वाहून गेले आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय कैलास नलवडे, माजी उपसरपंच प्रकाश मुरूमकर, केरबा नलवडे नारायण माने आदी शेतकऱ्यांची पीक पाण्यात गेली आहेत. या बंधाऱ्याची त्वरित दारे काढली नाही तर बंधाराही फुटण्याचा धोका आहे.
भारत माने म्हणाले, ‘तरटगाव बंधाऱ्याची सर्व दारे टाकली आहेत. त्यामुळे अतिरिक्त पाणी आमच्या शेतातून जात आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. याची त्वरित भरपाई द्यावी. हे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला मात्र दुर्लक्ष केले. आता आमचे क्षेत्र वाहून जात आहे. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.’
तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या, ‘तरटगाव बंधाऱ्याबाबत माहिती मिळाली असून मी स्वतः पाटबंधारे विभागाचे अधिकारी आवताडे यांच्या संपर्कात आहे. तेथे जाऊन पहाणी करत आहे. बिटरगाव श्री येथील शेतकऱ्यांचे नुकसानीबाबत फोन आले होते. मी पहाणी करत आहे.’
आमदार संजयमामा शिंदे म्हणाले, ‘सीना नदीवरील तरटगाव बंधाऱ्यांचे नुकसान होऊ नये याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देत आहे. कोणाचेही नुकसान होऊ नये याबाबत उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून आचारसंहितेमुळे नियमात बसून त्यांना मदत करता येईल का हे प्रशासनाने पहावे. नुकसान कसे टाळता येईल याबाबत प्रयत्न सुरु आहे.’