करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणीसाठी आज (मंगळवार) अतिशय चुरशीने मतदान झाले. १० प्रभागातून २० नगरसेवक व एक नगराध्यक्षासाठी १६ हजार ९७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ८ हजार ३४१ पुरुष, ७ हजार ७५४ महिला व एका इतर मतदारांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्य माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सहकुटुंब मतदान केले. यावेळी शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार जगताप यांच्या पत्नी नंदिनी जगताप उपस्थित होत्या.
करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या जगताप, भाजपच्या सुनीता देवी व करमाळा शहर विकास आघाडीच्या मोहिनी सावंत यांच्यात चुरशीने मतदान झाले आहे. मतदार कोणाला कौल देतील हे २१ तारखेला समजणार आहे. जगताप यांनी प्रभाग क्रमांक ५ येथे मतदान केल्यानंतर जगताप गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन बंडखोरी केलेल्या परदेशी कुटुंबीयांची भेट घेतली.

‘झालं गेले विसरून जा, आज मतदान झाले आपले कौटुंबिक संबंध कायम ठेऊयात’ असे म्हणून त्यांनी परदेशी यांच्या गालावरून मायेचा हात फिरवला. ‘आपले जुने कौटुंबिक संबंध आहेत’, असे ते म्हणाले. तेव्हा वातावरण देखील भावनिक झाले होते. दरम्यान तेथे उपस्थित भाजप उमेदवाराचे प्रतिनिधी रितेश कटारिया यांना जगताप म्हणाले, ‘रितेश मला तुझ्या घरी चहा घेईला येईचे आहे.’ मतदान केंद्राच्या बाजूलाच कटारिया यांचे घर होते. त्यावर कटारिया हे जगताप यांना घरी घेऊन गेले. तेथेही जगताप यांनी ‘निवडणुकीचा विषय आपला संपला. आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत’, असे म्हणाले. साधणार १५ मिनिटे राजकारणविरहित कटारिया यांच्या घरी चर्चा झाल्या.
कसे झाले मतदान?
सकाळी मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काही ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. प्रभाग क्रमांक १० मध्ये काही काळ वादावादी झाली. दोघांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करून पोलिसांनी त्यांना सोडून दिले. तर प्रभाग ३ मध्ये एका उमेदवाराने ईव्हीएममध्ये गोंधळ असल्याचा आरोप केला. मात्र त्याची पहाणी केल्यानंतर त्यात तथ्य आढळले नाही. दरम्यान निवडणुक निर्णय अधिकारी दिनेश पारगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे, उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा, पोलिस निरीक्षक रणजित माने उपस्थित होते.
सूक्ष्म नियोजन
करमाळा शहर विकास आघाडी (सावंत गट), भाजप (बागल, चिवटे व देवी) व शिवसेनेचे (जगताप गट) कार्यकर्ते मतदान केंद्रावर सूक्ष्म नियोजन करताना दिसले. भाजपचे निवडणूक निरीक्षक शशी कल्याणी व उमेदवार सुनीता देवी यांचे बुथ यंत्रणेवर बारकाईने लक्ष होते. अपवाद वगळता कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही.
अंदाज बांधणे कठीण
निवडणुकी दरम्यान तिन्ही गटाकडून सूक्ष्म नियोजन होते. सर्वांचीच यंत्रणा कडक होती त्यामुळे कोण विजयी होईल याचा अंदाज बांधणे कठीण जात आहे. कार्यकर्तेही तर्कवितर्क लावत आहेत. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवीण जाधव, नाना मोरे, अशपाक जमादार, जयंत दळवी, गणेश माने, अभिषक आव्हाड हे कार्यकर्तेही मतदान जास्त व्हावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसले. राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा कोणाला फटका बसेल हे पहावे लागेल.
