करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी सहशिक्षकाचे नाव मारुती ज्ञानदेव किरवे (रा. जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापुर) असे आहे. संबंधित शाळा करमाळा शहराच्या पश्चिम दिशेला ग्रामीण भागात आहे. हा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी एक व्यक्ती प्रयत्न करत होती. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य आणि पालकांचा संताप पाहून पोलिसांना गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले जात असून पारदर्शीपणे या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी केली आहे.
गुन्हा दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘चार महिन्यापासून १५ वर्षाच्या विद्यार्थिनीला विद्यालयातील गुन्हा दाखल झालेला संशयित आरोपी सहशिक्षक किरवे हा तिच्याकडे वाईट नजरेने पाहुन तिच्याजवळ जावुन बॅड टच करुन भेटत जा, बोलत जा, असे म्हणुन लज्जास्पद वर्तन करत होता.’ हा प्रकार लक्षात आल्यानंतर पालकांनी करमाळा पोलिस ठाण्यात एकत्र येऊन फिर्याद दिली. याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीजा म्हस्के करत आहेत. दरम्यान हा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी काहीजण प्रयत्न करत होते. यापूर्वीही असा एका शिक्षकाबाबत प्रकार झाला होता. मात्र त्याला समज देण्यात आली होती, असे सांगितले जात आहे. त्यामुळे दबावाला बळी न पडता पोलिसांनी पारदर्शीपणे गुन्ह्याचा तपास करावा, अशी मागणी केली जात आहे.
