घरकुल लाभार्थ्यांकडून तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचा सन्मान

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याची पारदर्शी प्रक्रिया सुरु केल्याबद्दल माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या समर्थकांनी आज (सोमवारी) तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचा सन्मान केला. यावेळी घरकुल लाभार्थ्यांनी येणाऱ्या अडचणी सांगितल्या त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

करमाळा तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांची अडचण होऊ नये यासाठी तहसीलदार ठोकडे यांनी कायम सकारात्मक भूमिका घेतली होती. बेकायदा वाळू उपशाच्या तक्रारीनंतर लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या तहसीलदार ठोकडे यांनी जप्त करून ठेवलेल्या वाळूचे पारदर्शीपणे वाटप सध्या सुरु झाले आहे. यामध्ये त्यांनी टप्पे पाडले आहेत. असाच पारदर्शीपणा पुढेही रहावा, अशी मागणी यावेळी लाभार्थ्यांनी केली आहे. कोणताही घरकुल लाभार्थी वाळूपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

तहसीलदार ठोकडे म्हणाल्या, ‘आठवड्यातील दर गुरुवारी आपण पंचायत समितीकडून आलेल्या यादीप्रमाणे टप्याटप्यात सर्व घरकुल लाभार्थींनी मोफत वाळू देणार आहोत. संबंधित लाभार्थीचे घरकुल सुरु आहे का? कोणत्या स्टेजला काम आहे? याची सर्व पडताळणी करून लाभार्थीला सरकार धोरणानुसार वाळू दिली जाणार आहे. कोणाचाही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतील जाणार आहे.’ यावेळी बिटरगाव श्री येथील भाऊसाहेब मुरूमकर यांनी गावात लाभार्थींना सवलतीच्या दरात वाळू वाहतूक करणार असल्याचे सांगितले. त्यावर त्यांचा सन्मान ठोकडे यांनी केला.

‘माजी आमदार शिंदे यांनी घरकुल लाभार्थींसाठी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यांना जास्तीतजास्त कशी मदत होईल यासाठी पाठपुरावा केला आहे. काही दिवसांपूर्वी घरकुल सर्व्हेला मुदतवाढ व मोफत वाळूची तत्काळ अमंलबजावणी करण्याची मागणी केली होती. आता त्याची प्रत्येक्षात वाटप सुरु झाले आहे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रदर्शकपणे ही वाळू सर्वांना द्यावी,’ असे यावेळी लाभार्थींनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *