करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा आगारातील एसटी बसचा प्रश्न काही दिवसांपासून चव्हाट्यावर आला आहे. वारंवार तक्रारी येऊनही आगार प्रमुख वीरेंद्र होनराव हे तक्रारी सोडवण्यासाठी अपयशी ठरले आहेत. त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप होताच तहसीलदार शिल्पा ठोकडे आक्रमक झाल्या आणि ‘तुमची मुलगी उशिरा घरी आल्यानंतर काय वाटेल’, असा थेट प्रश्न करत होनराव यांना धारेवर धरले. तहसीलदार ठोकडे या आक्रमक झाल्याचे पहाताच उपस्थितांना या बैठकीतून उद्देश साध्य झाल्याचे दिसले. पंधरा दिवसात बदल नाही दिसला तर पुढील निर्णय घेण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
करमाळा तालुक्यातील एसटी बसच्या सततच्या बिघाडाबाबत पत्रकार विशाल घोलप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला. प्रा. रामदास झोळ, दशरथ कांबळे, अॅड. राहुल सावंत, रवींद्र गोडगे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर तहसीलदार ठोकडे यांनी करमाळ्यात आगार प्रमुखांच्या उपस्थितीत सर्वांची बैठक घेतली. समाज माध्यमांमधून या बैठकीवर टीका झाली त्यावरही ‘बैठक होण्या आधी तुम्ही टीका का करता’ असे म्हणत ठोकडे यांनी उत्तर दिले होते.
बैठक सुरु होताच पत्रकार घोलप यांनी समस्या मांडल्या. त्यानंतर एकाचवेळी सर्वजण बोलू लागल्याने शाब्दिक चकमक उघडली. त्यानंतर पत्रकार सुनील भोसले यांनीही आगारप्रमुख होनराव हे नागरिकांचे फोन घेत नाहीत, अशी तक्रार केली. दरम्यान पत्रकार अशोक मुरूमकर यांनी एसटीच्या समस्येला आगारप्रमुखच जबाबदार असल्याचा आरोप केला. गेल्या सहा महिन्यापूर्वी एवढ्या समस्या नव्हत्या. आगारप्रमुख हे योग्य नियोजन करत नाहीत, असे खासगीत कर्मचारी सांगत आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. हे सांगत असतानाच गोडगे यांनीही आगारप्रमुखांचे नियोजन चुकीचे कसे आहे दाखवून दिले. ‘आमदार संजयमामा शिंदे यांनी पत्र देऊनही त्याची हे दखल घेत नाहीत. सोगावची गाडी यांनी बंद केली असल्याचा आरोप केला.’
आरोपावर उत्तर देताना होनराव यांनी गाणगापूर, पंढरपूरला व प्रासंगिक कराराला गाड्या गेल्यानंतर गैरसोय होते. आम्ही योग्य नियोजन करत असून गाड्यांमधील बिघाड करडण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. गाड्या दुरुस्तीसाठी मटेरियल मागवले जात आहे. त्यासाठी विशेष शिबीर घेतले जाणार असल्याचे सांगितले. त्यावर तहसीलदार ठोकडे यांनी सोलापुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नंबर मागितली. ‘आपण स्वतः एसटी बसने प्रवास केला आणि गैरसोय झाली तर काय होईल याचा विचार करा’, असे म्हणत त्यांनी होनराव यांना खडेबोल सुनावले.
कांबळे, ऍड. सावंत व प्रा. झोळ यांनी पंधरा दिवसात एसटी बसच्या समस्यांवर मार्ग निघाला नाही तर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. पत्रकार अशपाक सय्यद व पत्रकार सिद्धार्थ वाघमारे यांनीही प्रश्न मांडले. नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यावेळी उपस्थित होते.