करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगात सुरु आहेत. कोणीही पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. मात्र पंचनामा करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी किंवा इतर संबंधित जबाबदारी अधिकारी शेतात येईला उशीर झाला तर शेतकऱ्यांनी नुकसानीचा नोटकॉम कॅमेऱ्यात फोटो घेऊन ठेवावा त्याचेही पंचनामे ग्राह्य धरले जातील, असे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सांगितले आहे.
तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या, ‘करमाळा तालुक्यात अतिवृष्टी व सीना नदीचा पूर यामुळे नुकसान झालेले आहे. सीना नदीच्या पुरामुळे ज्यांच्या घरात पाणी गेले होते. त्यांचे तत्काळ पंचनामे करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तत्काळ संबंधित लाभार्थीच्या बँक खात्यात १० हजाराची मदत देण्यात आली आहे. याशिवाय अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचेही पंचनामे झाले आहेत. कृषी सहाय्यक, ग्राम महूसल अधिकारी व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून हे पंचनामे केले जात आहेत. तिघांचा मेळ करून हे पंचनामे होत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी त्यांना पोहोचायला वेळ लागू शकतो. मात्र कोणीही वंचित राहणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनीही सहकार्य करण्याची गरज असून संबंधित नुकसानीचा नोटकॉम कॅमेऱ्यात फोटो घेऊन ठेवावेत.’
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘सीना नदी काटावरील नुकसानीचे काही ठिकाणचे पहिल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले होते. मात्र पुन्हा तिसरा महापूर जास्त होता. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे वाढीव क्षेत्र घेतले जाईल. सर्व पंचनामे वेळेत करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या आहेत. कोणाचा पंचनामा राहिला असेल तर तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा’, असेही त्या म्हणाल्या आहेत.
पाण्यामुळे अडथळा…
सीना नदीला आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यावर भर आहे. पाण्यामुळे शेतात जाण्यास अडचणी होत्या. आता पाणी कमी झाले असून पंचनामे करण्यास वेग येईल. काही ठिकाणी अजूनही चिखल आहे. मात्र तरीही पंचनामे करण्यावर भर आहे, असे तहसीलदार ठोकडे म्हणाल्या आहेत.