करमाळा (सोलापूर) : नाशिक जिल्ह्यातील श्रावण चव्हाण हत्या प्रकरणाचा करमाळा पोलिसांकडून वेगाने तपास सुरु असून अटकेत असलेल्या संशयित आरोपींची पोलिस कोठडी उद्या (सोमवारी) संपणार असून त्यांना न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे. मात्र यातील संशयित गुन्हा दाखल झालेली महिला अजूनही फरार आहे. पोलिस तिचा शोध घेत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील श्रावण चव्हाण याची आईशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावा करण्याच्या हेतूने मृतदेह कारमध्ये टाकून करमाळा हद्दीतील कुकडी कॅनलजवळ आणला. त्यानंतर त्यांनी पेट्रोल टाकून गाडीसह पेटून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले. याचा तपास करमाळा पोलीस करत आहेत. यात तत्काळ तपास करून दोन संशयित आरोपीना अटक करण्यात आली. अटक केलेले दोन्ही संशयित सख्खे भाऊ आहेत. सुनील घाडगे व राहुल घाडगे अशी त्यांची नावे आहेत. हत्या झालेला चव्हाण व संशयित येवला तालुक्यातील आहेत.
संशयित आरोपीना पोलिस कोठडी मिळाल्यानंतर तिसऱ्या संशयित आरोपीचा तपास करमाळा पोलिसांनी घेतला. तिसरा संशयित आरोपी ही महिला आहे. ती महिला औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील असल्याचे समजत आहे. तिचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिस सुत्राकडून समजत आहे. संबंधित महिला व अटकेत असलेल्या एकाची मैत्रीण होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांची ओळख झाली होती, असे समजत आहे. याचा योग्य दिशेने पोलिसांचा तपास सुरु आहे.
करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मिटू जगदाळे हे तपास करत आहेत. प्रवीण साने, सागर कुंजीर, अजित उबाळे, गणेश शिंदे, तौफिक काझी यांनी तपासत मदत केली आहे.