करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याने पुन्हा एखादा ऊसाची थकबाकी देण्याची तारीख चुकवली आहे. याचा दोष बागल गटाला दिला जात असून शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल न दिल्यामुळे संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून कारखाना मालमत्तेवर बोजा चढवुन बिल द्या, अशी मागणी केली जात आहे. बील जमा न झाल्यास प्रजासत्ताकदिनी म्हणजे 26 जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा प्रा. रामदास झोळ यांनी दिला आहे.
श्री मकाई सहकारी साखर कारखाना 25 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना थकीत ऊस बिल देणार आहे, असे आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले होते. मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल व सर्व संचालक मंडळाच्या वतीने हे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अजूनही ऊस बिल न मिळाल्याने मकाई कारखान्यातील सत्ताधारी बागल गट व प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला आहे. करमाळा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह येथे शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे दशरथ कांबळे, पंचायत समितीचे माजी सदस्य ॲड. राहुल सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, शिवशंकर जगदाळे, हरिदास मोरे, प्रा. राजेश गायकवाड, अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने, आदिनाथचे माजी संचालक विठ्ठलराव शिंदे, काँग्रेस ओबीसी तालुकाध्यक्ष गफुर शेख उपस्थितीत होते. यावेळी शेतकऱ्यांच्या सहयाचे निवेदन तहसीलदार व करमाळा पोलिस ठाणे येथे देण्यात आले. यापूर्वी संगोबा करमाळा येथे आंदोलने झाली आहेत. बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनीही यापूर्वी आंदोलन केले होते. प्रत्येकवेळी तारीख दिली मात्र अजून बिल मिळाले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.