करमाळा (सोलापूर) : विधानसभा निवडणूक निकाल झाल्यानंतर करमाळ्यात एक बॅनर झळकला असून त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. याची चर्चाही सुरु झाली आहे. किल्ला वेस येथे हनुमान मंदिर परिसरात हा बॅनर आहे. किल्ल्यातून जाता- येता हा बॅनर सर्वांचे लक्ष वेधत आहे. ‘एक पीडित बंधू साथीला लाखो बंधू, आता प्रतीक्षा लव्ह जिहाद, जमीन जिहाद विरोधी कायद्यांची! आता प्रतीक्षा छत्रपतींचे गड किल्ले जिहादी अतिक्रमणमुक्त करून टाकण्याची! आता प्रतीक्षा हिंदू राष्ट्राची’ सकल हिंदू समाज, करमाळा शहर व तालुका असा मजकूर या बॅनरवर आहे.
विधानसभा निवडणुकीआधी आमदार निलेश राणे हे देखील करमाळ्यात अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी आले होते. उपजिल्हा रुग्णालय येथून श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे त्यांनी सभाही घेतली होती. त्यात विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला प्रचंड असं बहुमत मिळालेले आहे. त्यामुळेच हा बॅनर लावला असल्याची चर्चा करमाळा शहरात सुरु झाली आहे.