करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील नेर्ले येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विहिरीचे काम न करताच बिल काढले असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर विहिरीचे मोजमाफ करण्यात आले. मात्र त्याची प्रत दिली जात नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज (शुक्रवारी) उपोषण केले. दरम्यान ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे करमाळा उपअभियंता शेख यांनी मोजमाफ केल्याची प्रत दिली. त्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. पुढील निर्णय लवकरच घेतला जाईल, असे माजी सरपंच औदूंबरराजे यांनी सांगितले आहे.
माजी सरपंच औदूंबरराजे म्हणाले, नेर्ले येथे जल जीवन मिशनअंतर्गत काम न करता जुन्या पाणी पुरवठा विहिरीला फलक लावून सात लाख बिल काढले आहे. त्याविषयीची काही कागदपत्रे मागणी केली होती. ती कागदपत्रे सुमारे दोन महिन्यापासून पाणीपुरवठा कार्यालयातील अधिकारी कर्मचारी देत नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने पाणीपुरवठा कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
उपोषणास पंचायत समिती माजी सदस्य सुनील लोखंडे, ग्रामपंचायत माजी सरपंच अभिमान जगताप, दादासाहेब दौंड, सोसायटी चेअरमन तानाजी जगताप, अजित सावंत, महेशराजे भोसले पाटील, समाधान शेळके, छगन महाडिक, उत्तरेश्वर पन्हाळकर, बारीकराव कारंडे, बिभीषण सुरवसे, युवराज महाडिक, अनिल जगताप, विजय पन्हाळकर, बाळासाहेब नाईक इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
पावसामुळे कार्यलयतच उपोषण सुरु
करमाळा पंचायत समितीच्या आवारात ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे कार्यालय आहे. येथे पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना उपोषणास बसता येत नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनी सुरुवातीला कार्यालयात उपोषण सुरु केले. मात्र इतर नागरिकांना आंदोलनाचा त्रास होऊ नये म्हणून काही वेळाने नागरिक स्वतःहून कार्यलयाच्या दारात ओल्यातच तळवट टाकून उपोषणाला बसले. दरम्यान अधिकारीही समाधानकारक उत्तर देत नव्हते. या उपोषणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येताच पत्रकारांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. त्यावर दोन तासात प्रत दिली जाईल, असे शेख यांनी सांगितले. त्यानंतर हे उपोषण स्थागित झाले.