करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यासह सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समितीच्या सभापतीची निवड गुरुवारी १२ मार्चला होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अध्यासी (पिठासीन) अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यावेळी उपसभापतींचीही निवड केली जाणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार यासह पंचायत समितीचा सभापती व उपसभापतीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या निवडीची आता तारीख ठरली असून १२ मार्चला सभापती व उपसभापतीची निवड होणार असून यासाठी पिठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
करमाळ्यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे, माढा पंचायत समितीसाठी उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, बार्शीसाठी भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले, उत्तर सोलापूरसाठी उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, मोहोळसाठी उपजिल्हाधिकारी सीमा होळकर, पंढरपूरसाठी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, माळशिरससाठी उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, सांगोल्यासाठी उपविभागीय अधिकारी भैरप्पा माळी, मंगळवेढासाठी उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, दक्षिण सोलापूरसाठी उपजिल्हाधिकारी अंजली मरोड व अक्कलकोठ पंचायत समितीसाठी उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
